सलीम कुत्ता याच्यासोबत झालेली पार्टी कुणाच्या फार्म हाऊसवर? सुधाकर बडगुजर यांनी घेतले कुणाचे नाव…

| Updated on: Dec 21, 2023 | 2:59 PM

नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुधाकर बडगुजर यांना आज पुन्हा चौकशीसाठी बोलावले. सुधाकर बडगुजर यांना चौकशीसाठी बोलविण्याची ही पाचवी वेळ आहे. आज झालेल्या चौकशीतून एक महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.

सलीम कुत्ता याच्यासोबत झालेली पार्टी कुणाच्या फार्म हाऊसवर? सुधाकर बडगुजर यांनी घेतले कुणाचे नाव...
Sudhakar Badgujar, Devendra Fadnavis and Nitesh Rane
Follow us on

नाशिक | 20 डिसेंबर 2023 : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याचा हस्तक आणि 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टी केल्याच्या एक व्हिडीओ व्हायरल झाला. भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत यांनी त्या पार्टीचे फोटो आणि व्हिडिओ दाखवत ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यावर आरोप केला होता. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांची गंभीर दाखल घेत तातडीने चौकशीचे आदेश दिले. या प्रकरणी नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांची चौकशी सुरु केली आहे.

नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने सुधाकर बडगुजर यांना आज पुन्हा चौकशीसाठी बोलावले. सुधाकर बडगुजर यांना चौकशीसाठी बोलविण्याची ही पाचवी वेळ आहे. आज झालेल्या चौकशीतून एक महत्वाची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कार्यालयात झालेल्या या चौकशी दरम्यान बडगुजर यांनी महत्वाची माहिती दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ हे या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

नाशिकच्या आडगाव शिवारातील एका फार्म हाऊसवर ती पार्टी झाली होती. या पार्टीमध्ये सलीम कुत्ता सामील झाला होता. या पार्टीत नाच करतानाचे सलीम कुत्ता याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते. याच व्हायरल व्हिडीओ प्रकरणी पोलिसांनी आत्तापर्यंत १७ ते १८ जणांची चौकशी केली आहे. तर, बडगुजर यांची पाचव्यांदा चौकशी केली.

ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचे वकील उपलब्ध न झाल्याने आज त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत अशी माहिती पोलिसांनी दिली. या चौकशी दरम्यान सुधाकर बडगुजर यांनी ज्या फार्म हाऊसवर पार्टी केली ते फार्म हाऊसवर त्यांच्याच नातेवाईकांचे असल्याची माहिती समोर आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

वकील नसल्यामुळे सुधाकर बडगुजर यांनी काही प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे उद्या त्यांना पुन्हा चौकशीला बोलविण्याची शक्यता आहे अशी माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटले आहे.

ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणावरून विरोधी पक्षांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तर, आमदार नितेश राणे यांनी हे प्रकरण बाहेर काढून विरोधकांच्या आरोपातील हव्चा काढून टाकली. तर, फडणवीस यांनी तातडीने चौकशीचे आदेश देत विरोधकांवर मात केली. त्यामुळे सलीम कुत्ता याच्या त्या पार्टीवरून विरोधक एक पाऊल मागे गेल्याचे चित्र दिसले.