अहमदनगर । 12 ऑगस्ट 2023 : राज्यात पवार आणि विखे पाटील या दोन घराण्यातील राजकीय वैर महाराष्ट्राला काही नवे नाही. शरद पवार यांनी राज्यात आपला ठसा उमटवला असला तरी अहमदनगर जिल्ह्यात मात्र त्यांना विखे पाटील यांनी थोपवून धरले आहे. विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे देवेंद्र फडणवीस याचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय माजी मंत्री राम शिंदे यांचे वर्चस्व काहीसे कमी झाल्याचे चित्र दिसत होते. विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघामधून राम शिंदे यांचा पराभव केला.
अहमदनगरच्या राजकारणात राम शिंदे विरुद्ध रोहित पवार हा सामना सातत्याने रंगला. त्यात खासदार सुजय विखे पाटील यांनी उडी घेतली होती. सुजय विखे पाटील आणि पवार घराण्यातील रोहित पवार यांच्यात छुपी युती असल्याची जोरदार चर्चा नगरमध्ये होत होती. त्यावरून राम शिंदे यांनी विखे पुत्रांवर थेट निशाणा साधला होता.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुजय विखे पाटील आणि राम शिंदे यांच्यात समेट घडवून आणला होता. देवेंद्र फडणवीस यांच्या नगर दौऱ्यानंतर जामखेड येथे आयोजित छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करियर मार्गदर्शन शिबिराला खासदार सुजय विखे पाटील आणि आमदार रोहित पवार यांनी हजेरी लावत शिंदे यांना धक्का दिला होता.
त्यानंतर आता राष्ट्रवादीच नेते आमदार रोहित पवार आणि भाजप खासदार सुजय विखे पाटील यांचे एकत्रित बॅनर लागले आहेत. कर्जत तालुक्यात या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे. खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विकासकामांना निधी आणल्यामुळे दोघांचे एकत्रित फोटो असलेले बॅनर लावण्यात आले आहेत.
नगर जिल्ह्यात विखे आणि पवार या घराण्यांचे शत्रुत्व नेहमीच समोर येत असते. पण, या दोन्ही नेत्यांचे एकत्र बॅनर लावल्याने चर्चांना उधाण आले आहे. राजकीय वैर असलेल्या या दोन्ही घराण्यातील तिसऱ्या पिढीतील राजकीय वारसदार मात्र जिल्ह्यात उघड युतीचा झेंडा हाती घेत आहेत. तर, या बॅनरच्या माध्यमातुन राम शिंदे यांच्यावर कुरघोडी केल्याची चर्चाही रंगली आहे.