अहमदनगर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, मागच्या सगळ्या निवडणुकात सीएम आणि डीसीएम प्रचाराला गेले होते. शरद पवारांपासून (Sharad Pawar) सगळे नेते निवडणूक प्रचारात उतरले. याचा अर्थ त्यांना काही वेगळं दिसत असेल म्हणून उतरवलेय ना? यापूर्वीच्या कोणत्या पोटनिवडणुकीत पवार साहेब गेले होते? असा सवालही त्यांनी विचारला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिलं. प्रत्येक निवडणूक गांभिर्याने घ्यायची असते. मतं मागायला लाज कशाला वाटायला हवी? त्यामुळे आम्ही जातोय. पुणे पोटनिवडणुकीवर देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलंय.
राष्ट्रवादीतील भावी मुख्यमंत्री पदाच्या पोस्टरबाजीवर बोलताना फडणवीस म्हणाले, राष्ट्रवादीत ही पद्धत आहे. भावी पंतप्रधान, भावी मुख्यमंत्री असं सांगत असतात. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. माझ्या अनुभवातून मी शिकलोय. कधी काहीही होवू शकते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील, असं कोणाला वाटलं होतं का? ज्याला ज्याला जो भावी वाटतो त्याला शुभेच्छा, असंही फडणवीस यांनी म्हंटलं. सकाळच्या शपथविधीवर हळूहळू गौप्यस्फोट होताहेत. मी जे बोललो ते कसं खरं होते, ते हळूहळू समजतंय. आतापर्यंत अर्धच समजलंय. मी काहीही बोललो तर समोरून दुसरी गोष्ट बोलली जाते. त्यामुळे गोष्टी बाहेर येतात. असंच हळूहळू सगळ्या गोष्टी मी बाहेर आणेन.
आदित्य ठाकरे यांच्याबदद्ल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आम्ही वैचारीक विरोधक आहोत. शत्रू बिलकुल नाही. महाराष्ट्रात एक संस्कृती आहे. राजकारणात वैचारिक विरोध असतो. मात्र अलीकडच्या काळात शत्रुत्व बघायला मिळतेय. ते योग्य नाही. कधीतरी संपवावं लागेल. उद्धव ठाकरे किंवा आदित्य माझे शत्रू नाहीत. वैचारिक विरोधक झालोय. कारण त्यांनी दुसरा विचार पकडलाय, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
संजय राऊत यांना माझ्या क्षमतेवर विश्वास आहे. याबद्दल त्यांचे आभार मानतो. अलीकडच्या काळात संजय राऊत जे बोलतात ते गांभीर्याने घेण्यासारखं नाही. एका पक्षाचे नेते आणि प्रवक्ते आहेत. त्यांनी बोलताना संयम पाळायला हवा. लोकांना खरं वाटेल असं तरी बोललं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली.