मुंबई : शुक्रवारी राज्यातील जवळपास 271 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल लागले. या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाच्या (BJP) वाट्याला मोठं यश आलं आहे. भाजपाने 80 पेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने जोरदार मुसंडी मारत एकूण 40 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जनतेने भाजप शिवसेना युतीला कौल दिला असल्याचे ट्विट केले आहे. त्यांचे हे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे. ‘राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना – भाजपा युती सरकारला जनतेचा कौल मिळाला. शिवसेना – भाजपा युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना – भाजपा युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे तसेच मतदार राजाचे अभिनंदन आणि आभार.’ असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना – भाजपा युती सरकारला जनतेचा कौल…
शिवसेना – भाजपा युतीच्या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन तसेच निवडणुकीत मेहनत घेतलेल्या सर्व शिवसेना – भाजपा युतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे तसेच मतदार राजाचे अभिनंदन आणि आभार… pic.twitter.com/2Y72CAFuSy
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 6, 2022
औरंगाबाद हा शिवसेनेचा गड मानला जातो. औरंगाबादमधील वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीची निवडणूक शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाने प्रतिष्ठेची बनवली होती. मात्र या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव करत शिंदे गटाने बाजी मारली. या पराभवानंतर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिंदे गटाने शिवसेनेचे उमेदवार पळवले त्यामुळे त्यांचा विजय झाल्याचे खैरे यांनी म्हटले आहे. तसेच शिंदे गटाला मोठी रसद मिळाली त्याचा वापर करून शिंदे गटाने विजय मिळवल्याचेही खैरे यांनी म्हटलं आहे.
शुक्रवारी राज्यातील जवळपास 271 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल लागले. यामध्ये भाजपा हा नंबर एकचा पक्ष ठरला आहे. 80 पेक्षा अधिक ग्रामपंचायतींमध्ये भाजपाने सत्ता मिळवली. तर दुसऱ्या क्रमांंकावर राष्ट्रवादी काँग्रेस आहे. राष्ट्रवादीने राज्यातील 50 पेक्षा अधिक ग्रामपंचायतींध्ये सत्ता मिळवली आहे. या सर्वांमध्ये शिवसेनेला मात देत शिंदे गटाने तिसरा क्रमांक मिळवला आहे. जवळपास 40 ग्रामपंचायतींमध्ये शिंदे गटाने सत्ता मिळवली आहे. तर उद्धव ठाकरे गटाच्या वाट्याला अवघ्या 27 ग्रामपंचायतीच आल्या आहेत. तर काँग्रेसने 22 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे.