मुंबईः जोगेंद्र कवाडे (Jogendra Kawade) यांची पिपल्स रिपब्लिकन पार्टी आणि एकनाथ शिंदे यांची बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये आज महायुतीची घोषणा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि कवाडे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत युती जाहीर केली. शिंदेंची शिवसेना (Shivsena) आणि कवाडेंचा पीआरपी हे दोन्ही पक्ष संघर्षातून पुढे आले आहेत. दोन्ही पक्षांतील नेत्यांनी सामान्यांसाठी लाठ्या-काठ्या खाल्ल्या आहेत, त्यामुळे हे सामान्यांचं सरकार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
पत्रकार परिषदेत बोलताना जोगेंद्र कवाडे म्हणाले, मी राज्यभरात कार्यानिमित्त फिरत असतो. तेव्हा लोकांमध्ये ही भावना आहे. हे सामान्य जनतेचं सरकार आहे. ही पावती मिळणं फार अवघड आहे. ही पावती एकनाथ शिंदे यांच्या सरकारला मिळाली आहे….
मी एकदा पाहिलं. गरीब माणूस साहेबांच्या दालनात बसला होता. त्याचे प्रश्न खूप साधे होते. पण त्याचीही विचारपूस करून आश्वस्त केलं. असं व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राला मुख्यमंत्री रुपाने लाभलं. त्यामुळेच आमच्या पिपल्स रिपब्लिकन पक्षाने शिंदे यांच्या शिवसेनेसोबत करायची, असा निर्णय घेतला.
शिव, शाहू, फुले, बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांच्या सम्यक परिवर्तनाचा विचार हा आघाडीचा वैचारिक आधार आहे. महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने गतिमान करणं. भेदभाव न करता गरिबांच्या हक्कासाठी काम करण्यासाठी आम्ही यांच्या पक्षाला पाठिंबा देत आहोत, अशी भूमिका जोगेंद्र कवाडे यांनी मांडली.
पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘ आज जोगेंद्र कवाडे आणि त्यांचे सहकारी, पिपल्स रिपब्लिकन पार्टी यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षासोबत युती करण्याचा निर्णय घेतला. त्यांना धन्यवाद देतो. सरकार बदललं तेव्हाच कवाडे यांच्या कार्यकर्त्यांनी ही सर्वसामान्यांचं सरकार अशी भावना व्यक्त केली, असं मुख्यमंत्री म्हणाले.
दोन्ही पक्ष संघर्षातून पुढे आले. हा संघर्ष साधा-सोपा नव्हता. जोगेंद्र कवाडे हे एक सुशिक्षित आणि अभ्यासू नेता आहेत. आंदोलनाच्या काळात त्यांनी अतिशय आक्रमकपणे भूमिका मांडली. ते 6 महिने जेलमध्ये होते. 20 जिल्ह्यांत त्यांच्या भाषणांवर बंदी होती.
ओबीसी प्रश्नावर ते तिहार जेलमध्येही होते. लढवय्ये नेते आहेत.
त्यांचा पक्ष आमच्यासोबत आल्यास आम्ही राज्याचा सर्वांगिण विकास करू. सर्वसामान्य घटकांना न्याय देण्याचं काम करू. एक भूमिका, एक विचार आणि काही आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करू, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं…
कवाडे यांच्या पिपल्स रिपब्लिकन पक्षाने बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला पाठींबा दिल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. कवाडे यांनी शिंदे यांच्याकडे 41 जागा मागितल्याचं पत्रात म्हटलं आहे. तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि ठाकरे गटाची युती होण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे राज्यातील दलित मतांचं विभाजन कशा प्रकारे होतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.