औरंगाबाद : एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील अडचणीत येण्याची शक्यता आहे. इम्तियाज जलील यांच्या निवडीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल झाली आहे. धर्माच्या नावावर मतं मागितल्यामुळे इम्तियाज जलील यांचं सदस्यत्व रद्द करण्याची आणि त्यांना निवडणुकीतून अपात्र ठरवण्याची याचिकेद्वारे मागणी करण्यात आली आहे.
धर्माचा नावावर मतं मागणे, प्रतिज्ञापत्रात दाखल गुन्ह्याची कलमे लपवणे आणि खर्चाचा हिशोब न मांडणे या कारणावरून याचिका दाखल झाली. शेख नदीम शेख करीम या लोकसभेतील पराभूत उमेदवाराने याचिका दाखल केली आहे. धर्माच्या नावावर मतं मगितल्याच्या सीडी आणि इतर पुरावे न्यायालयात सादर करण्यात आले आहेत. या पुराव्यांमुळे इम्तियाज जलील यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
इम्तियाज जलील यांनी औरंगाबादमध्ये शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा पराभव केला होता. गेल्या चार टर्मपासून खासदार असलेल्या खैरे यांच्यासाठी हा पराभव जिव्हारी लागणारा होता. त्यातच आता अपक्ष उमेदवाराने इम्तियाज जलील यांच्यावर विविध आरोप करत याचिका दाखल केली आहे. प्रतिज्ञापत्रात स्वतःवर असलेले गुन्हे सार्वजनिक करणं उमेदवाराला अनिवार्य आहे, तसेच याबाबत सुप्रीम कोर्टाचेही आदेश आहेत. इम्तियाज जलील यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास सदस्यत्व रद्द होऊ शकतं.
इम्तियाज जलील यांचं सदस्यत्व रद्द होईल आणि त्यांना पुन्हा निवडणूक लढण्यासाठीही अपात्र केलं जाईल, असा दावा याचिकाकर्त्यांच्या वकिलाने केलाय. जलील यांना अगोदरच निवडणूक खर्चाबाबत आयोगाची नोटीस आलेली आहे, त्यातच त्यांनी स्वतःवरील अनेक कलमं लपवलेले असल्यामुळे तोही एक मुद्दा आहे, घटनेनुसार धर्माच्या नावावर मतं मागता येत नाहीत, पण लहान मुलांमार्फत समाजामध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य व्हायरल करण्यात आली, असंही वकिलांनी म्हटलंय.