रणजित जाधव, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पिंपरी-चिंचवड | 17 ऑक्टोबर 2023 : भाजप आमदार गोपीचंद पडळकर वारंवार पवार कुटुंबावर टीका करत आहेत. शरद पवार यांच्यावर वारंवार निशाणा साधत आहेत. अजित पवार हे युतीत असतानाही पडळकर त्यांच्यावर टीका करताना दिसतात. तर सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावरही पडळकर टीकास्त्र डागताना दिसतात. त्यावर आता राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे. वारंवार केल्या जाणाऱ्या या टीकेला त्यांनी उत्तर दिलं आहे. जे आमदार सत्तेत असतात. ज्यांच्याकडे अधिकार आहेत त्यांनी काम करून घ्यायचं असतं. उगाच हवेत बोलायचं नसतं. या अशा लोकांवर बोलून मी वेळ वाया घालवणार नाही. खास करून हवेत बोलणाऱ्या लोकांबाबतीत मी काहीही बोलू इच्छित नाह, असं रोहित पवार म्हणाले.
माजी पोलीस अधिकारी मीरा बोरवणकर यांचं मॅडम कमिशनर हे पुस्तक प्रकाशित झालं. या पुस्तकातील एका टिपण्णीवरून वाद निर्माण झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतचा हा उल्लेख आहे. यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात वाद निर्माण झाला आहे. यावरही रोहित पवार यांनी भाष्य केलं आहे. एखाद्या बंद खोलीमध्ये काही चर्चा झाली असेल ती आम्हाला सांगता येऊ शकत नाही. परंतु यामध्ये अनेक पैलू असतील. हळूहळू लोकनेत्याची ताकद कशी कमी करायची. यासाठी भाजप अनेक वेळा प्रयत्न करत असतात. ही जी घटना आहे ती अचानकपणे समोर आली. त्यातून अजितदादांची ताकद कमी करण्याचा प्रयत्न होतोय का? असाही प्रश्न उपस्थित झालाय, असं रोहित पवार म्हणाले.
जे कोणी भाजपच्या विरोधात बोलत आहेत. त्यांच्यावर विविध प्रकारच्या कारवाया होत आहेत. या कारवाया होतच राहणार आहेत. विचार जपण्यासाठी आपल्याला सर्वांना संघर्ष करावाच लागणार आहे. आम्ही ती भूमिका घेतलेली आहे आणि आम्ही संघर्ष करत राहू, असंही रोहित पवार म्हणालेत.
विधानसभा अध्यक्षांना जर दिल्लीमध्ये जाऊन मार्गदर्शन घ्यावं लागतं असेल. तर ही चुकीची प्रथा सुरू झाली आहे, असं मला वाटतं. आपल्या अध्यक्षांना दिल्लीमध्ये जावं लागतं याच्यापेक्षा मोठी खंत ती काय? महाराष्ट्र कधी दिल्ली समोर झुकत नाही, ही भावना आपल्या सर्वांची आहे. जर विधानसभा अध्यक्षांनाच दिल्लीला जाऊन मार्गदर्शन घ्यावं लागत असेल तर ही खरंच चुकीची प्रथा सुरू झाली आहे, असं म्हणत रोहित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर टीकास्त्र डागलंय.