मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी भाजपाध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील प्रस्तावित दौरे करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणखी एका सभेचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी विविध विकासकामांचा शुभारंभही करण्यात येईल. तसेच अमित शाह पक्ष संघटनाच्या दृष्टीने तयारीचा आढावा घेतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह फेब्रुवारी महिन्यातच दौरा करणार आहेत. अमित शाह 9 फेब्रुवारीला पुण्यात असतील, तर 26 फेब्रुवारीला कोल्हापुरात असतील. या दौऱ्यात ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि पक्ष संघटनेच्या निवडणूकपूर्व कामाचा आढावा घेणार आहेत.
दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी धुळे येथे 16 फेब्रुवारीला दौरा करणार आहेत. यावेळी विविध विकासकामांचा शुभारंभ होईल आणि भाजपची मोठी सभाही होणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यातच लोकसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
अमित शाह यांनी आचारसंहितेपूर्वीचा भाजपचा आढावा घेतला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी सर्व राज्यातील प्रदेशाध्यक्षांशी संवाद साधला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुंबईचे भाजप अध्यक्ष यांसह भाजप पदाधिकाऱ्यांसोबत चर्चाही केली. निवडणुकीअगोदर संघटनात्मक बळकटीसाठी विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत.
भाजपाध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सध्या सर्वच राज्यांमध्ये दौरे सुरु आहेत. अमित शाह निवडणूकपूर्व तयारीचा आढावा घेत आहेत. तर मोदींकडून विविध विकासकामांचं भूमीपूजन आणि लोकार्पण केलं जात आहे. महाराष्ट्रात कल्याण, पुणे आणि सोलापुरात यापूर्वी मोदींनी विकासकामांचा शुभारंभ केला आहे. सोलापुरात भाजपची भव्य सभाही झाल होती.