नवी दिल्ली : निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारसभांमध्ये टीका करताना कोण कुणावर काय बोलेल याचा नेम नाही. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणा राज्याच्या निवडणुकांमध्ये प्रचाराची पातळी एवढी खाली गेली आहे, की नेत्यांच्या आई-वडिलांनाही टीका करताना मध्ये आणलं जातंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई-वडिलांचा उद्धार केल्यानंतर आता विरोधकांनी पंतप्रधान दिवसातून किती वेळा कपडे बदलतात त्यावरुन निशाणा साधलाय.
संविधान दिनाच्या निमित्ताने देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. याचाच एक भाग म्हणून काँग्रेसच्या अनुसूचित जाती मोर्चाने जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये संविधान सन्मान कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि यासाठी प्रमुख पाहुणे होते शरद यादव. तसं तर निमित्त संविधान दिनाचं होतं पण, शरद यादव यांनी राम मंदिर आणि इतर मुद्दे काढत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला.
महात्मा गांधी जेव्हा भारतात परतले तेव्हा सुटाबुटात आले होते. मात्र भारतीयांची परिस्थिती पाहून त्यांनी धोतर घातलं. आमचे पंतप्रधान, जे चड्डीत आले होते, आता रोज पाच ते सहा वेळा कपडे बदलतात. त्यांचं नाव गिनीज बूकमध्ये यायला पाहिजे, अशी टीका शरद यादव यांनी केली.
सध्या राम मंदिर प्रकरण गाजत आहे. जेवढे मंदिर आणि मशिदी भारतात आहेत, तेवढ्या जगात कुठेही नाहीत. रामाचा जन्म अयोध्येतच झाला हे यांना कसं माहित? हे तिथे काय करत होते? हे त्यावेळी होते का? कुणाला माहिती आहे का की रामाचा जन्म अयोध्येतच झालाय? असे विविध प्रश्न शरद यादव यांनी उपस्थित केले.
मोदींच्या आई-वडिलांवर कोण बोललं?
23 नोव्हेंबर 2018 रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथील प्रचारसभेत बोलताना काँग्रेस नेते राज बब्बर म्हणाले, जेव्हा ते (मोदी) म्हणतात की, डॉलरच्या समोर रुपया इतका खाली गेला की, तत्कालीन पंतप्रधानांच्या वयाजवळ जात होता. मग आजचा रुपया हा तुमच्या पूजनीय आईच्या वयाच्या जवळ जाणं सुरु झालं आहे.”
24 नोव्हेंबर 2018 रोजी राजस्थानमधील बारमेरमध्ये काँग्रेसची प्रचारसभा झाली. त्यात काँग्रेसचे वरिष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून म्हटले, “पंतप्रधान बनण्याआधी तुम्हाला कोण ओळखत होतं? आजही तुमच्या वडिलांचं नाव कुणाला माहित नाही. राहुल गांधींच्या वडिलांचं नाव सगळ्यांना माहित आहे.”