मुंबईतील विविध प्रकल्पाची मुहूर्तमेढ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या शनिवार 13 जुलै रोजी रोवली जाणार आहे. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्प ( 3 टप्पा )अंतर्गत येणाऱ्या बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या दुहेरी बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन देखील या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
पूर्व आणि पश्चिम उपनगरांना रस्ते मार्गाने जोडण्याच्या उद्देशाने महत्वाकांक्षी गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता ( लिंक रोड) प्रकल्प ( जीएमएलआर ) मुंबई महानगर पालिकेने हाती घेतला आहे. सुमारे १२.२० किमी लांबीच्या या मार्गाने पूर्व आणि पश्चिम उपनगरांदरम्यान प्रवासाची वेळ ७५ मिनिटांवरुन २५ मिनिटांवर येणार आहे. या प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्पा बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार आहे. यासाठी प्रत्येकी ४.७ किमी अंतराच्या जुळा बोगद्यांची निर्मिती केली जाणार आहे.
संजय गांधी नॅशनल पार्क येथील दुहेरी बोगद्यामुळे ठाणे ते बोरीवरी हे अंतर l2 किमीने कमी होणार आहे. सध्या ठाणे ते बोरीवली व्हाया घोडबंदर मार्गाने जाण्यासाठी 23 किमीचा मार्ग असून पिक अवरमध्ये त्याने प्रवासासाठी तास ते दीड तास इतका वेळ लागतो. परंतू प्रस्तावित दुहेरी बोगद्याने ( एका बोगद्यात तीन पदरी रस्ता) वाहनांना अर्ध्यातासांत ठाण्याहून बोरीवली गाठता येईल अशी योजना आहे. याच दुहेरी बोगदा प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी १३ जुलै रोजी होणार आहे. गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे सायंकाळी ५ वाजता सोहळ्याचे आयोजन होणार आहे.
• गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता ( लिंक रोड ) प्रकल्प ( तिसरा टप्पा ) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून प्रत्येकी ४.७ किलोमीटर लांब आणि ४५.७० मीटर रुंदीचा जुळा बोगदा
• जोड मार्ग आणि अन्य बाबींसह तिसऱ्या टप्प्यातील मार्गाची एकूण लांबी ६.६५ किलोमीटर
• हा जुळा बोगदा जमिनीखाली २० ते १६० मीटर खोल भागात असेल
• प्रत्येकी ३०० मीटर अंतरावर दोन्ही बोगदे एकमेकांशी जोडले जातील
• सुमारे १४.२ मीटर व्यासाच्या बोगदा खोदण्याच्या संयंत्राने (टीबीएम) होणार बोगद्याचे खोदकाम
• बोगद्यामध्ये अत्याधुनिक प्रकाशव्यवस्था, वायुविजन प्रणाली, अग्निरोधक यंत्रणा, सीसीटीव्ही, बोगद्याच्या दोन्ही दिशांना नियंत्रण कक्ष आदी सुविधांचा समावेश
• पर्जन्य जलवाहिनी, भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी लागणाऱ्या संभाव्य जलवाहिन्या आदी उपयोगिता वाहिन्यांची बोगद्याच्या खाली व्यवस्था
• संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वनस्पती, प्राणी तसेच आरे, विहार व तुळशी तलाव यांचे क्षेत्र बाधित न करता आणि त्यांना हानी न पोहोचवता बोगद्याचे बांधकाम होणार
• प्रकल्पासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये भूसंपादन करण्यात आलेले नाही
• प्राण्यांच्या सुरक्षित विहारासाठी पशूपथाची निर्मिती
• कार्बन उत्सर्जनात दरवर्षी सुमारे २२ हजार ४०० टनांनी घट होणार
• मुंबईकरांच्या प्रवासाच्या वेळेत आणि इंधनाचीही बचत होणार
• जुळा बोगद्याच्या निर्मितीसाठी अपेक्षित एकूण खर्च- ६३०१.०८ कोटी रुपये
• जुळा बोगद्याचे काम पूर्णत्वास येण्याचा अंदाजित कालावधी- ऑक्टोबर २०२८ पर्यंत
• प्रकल्पाची सद्यस्थिती: एकूण स्टेशन सर्वेक्षण, माती तपासणीची कामे, तात्पुरते रस्ते वळविण्याचे काम तसेच प्राथमिक संरेखन (डिझाइन) कार्य प्रगतिपथावर
• बोगदा प्रकल्पामुळे विस्थापित होणाऱ्या निवासी आणि व्यावसायिक प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाकरीता, तळमजला + २३ मजल्यांच्या ७ इमारती आणि तळमजला + ३ मजल्यांची बाजार इमारतीची कामे प्रगतिपथावर आहेत
• गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग ( जीएमएलआर ) प्रकल्प एकूण चार टप्प्यांमध्ये प्रस्तावित
• प्रकल्पाची एकूण लांबी १२.२० किलोमीटर
• संपूर्ण प्रकल्पासाठी अंदाजे एकूण १४ हजार कोटी रुपये खर्च
• पहिल्या टप्प्यात नाहूर रेल्वे स्थानकाजवळील मार्गांसह सध्याच्या उड्डाणपुलाचे ( ROB ) रुंदीकरण
• दुसऱ्या टप्प्यात ३० मीटर रुंद रस्त्याचे ४५.७० मीटरपर्यंत रुंदीकरण
• टप्पा ३ ( अ ) मध्ये उड्डाणपूल, एलिव्हेटेड रोटरीचे बांधकाम
• टप्पा ३ ( ब ) मध्ये गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे १.२२ किमी लांबीचा तिहेरी मार्गिका
• ( ३ बाय ३ ) असलेला पेटी बोगदा ( कट अँड कव्हर बांधकाम ) आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून प्रत्येकी ४.७ किलोमीटर लांबीचा जुळा बोगदा
• चौथ्या टप्प्यात नाहूर ते ऐरोली टोल नाकापर्यंत पूर्व द्रुतगती महामार्ग ओलांडणारा प्रस्तावित द्विस्तरीय उड्डाणपूल तसेच पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि जीएमएलआरच्या जंक्शनवर वाहनांसाठी भूयारी मार्ग ( व्हीयूपी ) या कामांचा समावेश
• गोरेगाव-मुलुंड जोड मार्ग हा मुंबईमधील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना एकमेकांशी जोडणारा चौथा प्रमुख जोडरस्ता, विशेषत: उत्तर मुंबईतील वाहतुकीस मोठा फायदा.
• या प्रकल्पामुळे पूर्व-पश्चिम उपनगरांदरम्यान नवीन जोडरस्ता तयार होईल. त्यामुळे, वाहतूक कोंडीपासून दिलासा.
• या प्रकल्पामुळे पश्चिम उपनगराला नवी मुंबई येथील नवीन प्रस्तावित विमानतळ आणि पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाशी थेट जोडरस्ता उपलब्ध होणार
• नाशिक महामार्गावर जाणाऱ्या वाहनांनाही या प्रकल्पामुळे फायदा
• जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्याच्या तुलनेत प्रवासाचे अंतर सुमारे ८.८० किलोमीटरने कमी होईल
• गोरेगाव ते मुलुंडदरम्यान प्रवासाचा कालावधी ७५ मिनिटांवरून सुमारे २५ मिनिटे होईल
• इंधन वापरात बचत होईल. मुंबईच्या वायू गुणवत्ता निर्देशांकातही ( एक्यूआय ) सुधारणा होईल