मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपचाच झेंडा फडकवतील की नाही याबाबत निर्णय तर मतदार घेतील. पण मोदींची सोशल मीडियावरील लोकप्रियता कायम आहे. ट्विटर इंडियाच्या रिपोर्टनुसार, ट्विटरवर सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या राजकारण्यांमध्ये मोदी पहिल्या क्रमांकावर आहेत. एवढंच नाही, तर टॉप 10 मध्ये भाजपचेच चार नेते आहेत.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राफेल प्रकरणावरुन ट्विटरच्या माध्यमातून सतत मोदी सरकारवर टीका केली. राहुल गांधी सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या चेहऱ्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत. मोदींनंतर सोशल मीडियावर आता राहुल गांधींचा क्रमांक लागला आहे.
ट्विटरच्या रिपोर्टनुसार, पहिल्या क्रमांकावर मोदी, दुसऱ्या क्रमांकावर राहुल गांधी, तिसऱ्या क्रमांकावर भाजपाध्यक्ष अमित शाह, चौथ्या क्रमांकावर यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पाचव्या क्रमांकावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा नंबर आहे.
मोदींचा इंस्टाग्रामवर विक्रम
पंतप्रधान मोदी इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असणारे जगातील एकमेव नेते आहेत. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी लग्नानंतर मोदींना रिसेप्शनचं निमंत्रण देण्यासाठी जी भेट घेतली होती, त्या भेटीच्या फोटोला सर्वाधिक लाईक्स मिळाले आहेत.
इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही मागे टाकलं आहे. इंडोनेशियाचे राष्ट्रपती जोको विडोडो दुसऱ्या, तर डोनाल्ड ट्रम्प तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पंतप्रधान मोदींची जगातील सर्वाधिक प्रभावी नेते अशीही नोंद करण्यात आली आहे. कारण, इंस्टाग्रामवर त्यांनी शेअर केलेल्या 80 फोटो आणि व्हिडीओंना 873302 युझर्सनी प्रतिक्रिया दिली आहे.