सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रोज एका राज्याच्या दौऱ्यावर आहेत. कोट्यवधींच्या योजनांचा रोज शुभारंभ केला जातोय. महाराष्ट्रातही सोलापुरात मोदींची सभा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 9 जानेवारीला येणार असून सोलापुरात ते विविध विकासकामांचं उद्घाटन करणार आहेत. मात्र विकासकामांच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी शहर आणि जिल्ह्यात मरगळलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांचं पक्षसंघटन आणि आगामी प्रचार हाच उद्देश असल्याची चर्चा आहे.
कधी पंजाब, तर कधी आसाम. मोदी रोज एका राज्यात आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यात आणि कल्याणमध्ये विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला होता. त्यातच आता ते पुन्हा एकदा महाराष्ट्रात येणार आहेत. सोलापूरच्या पार्क स्टेडियमवर येत्या 9 जानेवारीला हा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. 9 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकाळी 11.5 मिनिटांनी सोलापुरात हेलिकॉफ्टरने येतील.
जवळपास सव्वा तास नरेंद्र मोदी हे सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. या सव्वा तासामध्ये जाहीर सभेपूर्वी मोदी हे विविध विकासकामांचं उद्घाटन आणि भूमीपूजन करणार आहेत. सोलापुरातील विडी कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या 30 हजार घरकुलाचे हस्तांतरण, स्मार्ट सिटीच्या कामाचं उद्घाटन, 180 कोटी रुपयांच्या ड्रेनेज योजनेचं उद्घाटन, देहू-आळंदी पालखी मार्गाचं भूमीपूजन, तुळजापूर-अक्कलकोट राष्ट्रीय महामार्गाचं भूमीपूजन अशा विविध कामांचं भूमीपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा हा शासकीय दौरा असला तरी भाजपनेही मोदींच्या कार्यक्रमासाठी कंबर कसलीय.
जाहीर सभा घेऊन मोदी आगामी निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार हे निश्चित आहे. प्रचाराची सुरुवात सोलापुरातून करण्याचं कारणही तसंच आहे. पाच वर्षांपूर्वी सोलापूर लोकसभा काँग्रेसची मोठी ताकद होती. तत्कालीन गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा मोठा प्रभाव होता. महापालिका काँग्रेसचा बालेकिल्लाच होता. त्या मानाने भाजप केवळ जिल्ह्यात नावालाच होते. मात्र मोदी लाटेत शिंदेचा पराभव झाला. एक प्रकारची शिंदेशाही संपली. तर काँग्रेसची पालिकेतील वर्षानुवर्षाची सत्ता जाऊन भाजपने पालिकेत विजयश्री मिळवली.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत भाजपने महाआघाडी करून सत्ता काबीज केली. मात्र मागील साडे चार वर्षात जिल्ह्यात सत्तेत असलेल्या भाजपाला अंतर्गत गटबाजीने पूर्णतः पोखरून काढलंय. पालकमंत्री सुभाष देशमुख आणि सहकार मंत्री यांच्यातला वाद तर प्रदेशाध्यक्षांपर्यंत गेलाय. मात्र तोडगा काही निघाला नाही. परिणाम म्हणून विकासकामांना खीळ बसली. तर खासदार शरद बनसोडे यांच्या कामाबाबत खुद्द पक्षश्रेष्ठी आणि भाजपचे लोकच नाराज असल्याचं बोललं जातं. त्यामुळे विकासकामांच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी हे प्रचार आणि भाजपाची 2014 मध्ये जशी मजबूत पकड होती, तशीच पकड कायम ठेवण्यासाठी येत असल्याचं राजकीय अभ्यासक सांगतात.
एकूणच दोन मंत्र्यातील वाद, खासदारांचे मतदारसंघातील दुर्लक्ष आणि रेंगाळलेली विकासकामे या सर्व गोष्टींमुळे सत्ताधारी भाजपची प्रतिमा मालिन झाल्याचं चित्र आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील स्थिती आहे, अगदी तशीच स्थिती कमी अधिक प्रमाणात देशातल्या अनेक लोकसभा मतदार संघात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत मोदींना एकेक जागांसाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे.