सात टप्प्यातील लोकसभा निवडणूक या 7 घटनांमुळे गाजली, काय आहेत त्या प्रमुख घटना?

| Updated on: May 31, 2024 | 6:48 PM

2024 ची लोकसभा निवडणुक सात टप्प्यात झाली. या सात टप्प्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता संपला आहे. ही निवडणूक प्रमुख सात मुद्द्यांमुळे गाजली. याशिवाय विरोधकांनी महागाई आणि बेरोजगारीचा मुद्दाही ठळकपणे उपस्थित केला. या 7 टप्प्यांमधील प्रमुख घटनांवर एक नजर टाकू या.

सात टप्प्यातील लोकसभा निवडणूक या 7 घटनांमुळे गाजली, काय आहेत त्या प्रमुख घटना?
pm narendra modi and rahul gandhi
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

नवी दिल्ली : देशात लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी 1 जून रोजी मतदान होत आहे. 4 जून रोजी निवडणुक निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. निवडणुकीच्या घोषणेनंतर देशात आचारसंहिता लागू झाली. यानंतर भाजप नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेस नेतृत्वाखालील इंडिया आघाडी यांनी आपापली निवडणूक रणनीती अधिक धारदार करण्यास सुरुवात केली. सात टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीत काँग्रेसने बेरोजगारी, महागाई, जात जनगणना तसेच संविधान वाचवण्याचे मुद्दे प्रचारातून समोर आणले. तर, एनडीएने मोदी सरकारच्या 10 वर्षातील विकासकामांची जंत्री जनतेसमोर ठेवली. पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर मुस्लिम तुष्टीकरणाचा तसेच काँग्रेस सत्तेत आल्यास गरीब महिलांचे मंगळसूत्र हिसकावून घेईल, असा आरोपही केला. याशिवाय या सर्व प्रचारात अनेक मुद्दे प्रबळ राहिले. 7 टप्प्यातील या निवडणुकीत प्रमुख घटना काय होत्या चला जाणून घेऊ…

पहिला टप्पा : बिल गेट्स यांनी घेतली मुलाखत

पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी एप्रिलच्या पहिल्या 10 दिवसात पंतप्रधान मोदी यांनी 20 हून अधिक रॅली आणि रोड शो केले. अनेक वृत्तवाहिन्या, मासिकांना त्यांनी मुलाखती दिल्या. याआधी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये मोदी यांनी विशेष करून विज्ञान, आरोग्य क्षेत्र, हवामान यासह अनेक विषयांवर चर्चा केली. बिल गेट्स यांच्या मुलाखतीची माहिती खुद्द पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर दिली होती. यादरम्यान मोदी यांनी अनिमेश अग्रवाल, मिथिलेश पाटणकर, पायल धरणे, नमन माथूर, अंशू बिश्त यासारख्या नामवंत गेमिंग निर्मात्यांचीही भेट घेतली होती. दरम्यान, काँग्रेसने 5 एप्रिलला आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात 5 न्याय आणि 25 गॅंरंटीचा समावेश होता. तर, भाजपने 14 एप्रिल रोजी जाहीरनामा प्रसिद्ध केला. पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी आम आदमी पक्षाने (आप) तिहार तुरुंगात बंद असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जनतेचा पाठिंबा मिळावा यासाठी ‘जेल का जवाब वोट से’ ही मोहीम सुरू केली.

दुसरा टप्प्यातील प्रचारात मंगळसूत्र दाखल

दुसऱ्या टप्प्यातील प्रचारात काँग्रेस आणि भाजपने एकमेकांवर तिखट हल्लाबोल केला. या टप्प्यात भाजपने निवडणूक प्रचारात मंगळसूत्र समोर आणले. पंतप्रधान मोदी यांनी राजस्थानमधील निवडणूक रॅलीत काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा हवाला देत आरोप केला की, काँग्रेस सत्तेवर आल्यास ते लोकांच्या संपत्तीचे वाटप घुसखोर आणि ज्यांना जास्त मुले आहेत त्यांच्यामध्ये करू शकते. त्याचप्रमाणे त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या ‘देशातील संसाधनांवर मुस्लिमांचा पहिला हक्क आहे.’ या विधानाचीही आठवण करून दिली.

पंतप्रधान मोदी सातत्याने त्यांनतर प्रत्येक रॅलीत हा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांकडून मंगळसूत्र हिसकावून घेईल असा आरोप मोदी करत होते. देशातील दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींवर 70 वर्षांपासून ‘अन्याय’ करण्याचे पाप काँग्रेसने केले आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला याची शिक्षा भोगावी लागेल, अशी टीका भाजपने केली. हे आरोप फेटाळून लावताना काँग्रेसने मोदी यांचे आरोप निराधार असल्याचे म्हटले. तसेच, जनतेला संविधान वाचवा आणि सर्वसमावेशक विकासासाठी आपल्या मताचा वापर करण्याचे आवाहन केले. लोकशाहीच्या रक्षणासाठी ‘संविधानाचे सैनिक’ म्हणून घराबाहेर पडण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी केले.

तिसरा टप्पा : प्रज्वल रेवन्ना यांचा कथित सेक्स व्हिडिओ

मतदानाच्या तिसऱ्या टप्प्याआधी माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू आणि हसनचे खासदार प्रज्वल रेवन्ना यांचे अनेक कथित सेक्स व्हिडिओ लीक झाले. प्रज्वलवर बलात्कार आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले. त्याच्या सेक्स व्हिडिओ प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले. त्याचे वडील आमदार एचडी रेवण्णा यांना महिलेचे अपहरण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. प्रज्वलने मतदानाच्या एका दिवसानंतर 27 एप्रिल रोजी देश सोडला. त्याच्याविरोधात ‘ब्लू कॉर्नर’ नोटीस बजावण्यात आली होती. या प्रकरणामुळे काँग्रेसच्या हाती आयते कोलीत मिळाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 4 मे रोजी प्रज्वल रेवण्णा यांच्या अटकेचे आदेश जारी केले. याच प्रज्वल रेवन्ना यांच्या समर्थनार्थ खुद्द पंतप्रधान मोदी यांनी रॅली काढून मते मागितली होती. विशेष म्हणजे देश सोडून गेलेला प्रज्वल भारतात कधी परत येणार यावरून कॉंग्रेसने भाजपा घेरले.

केजरीवालांची तुरुंगातून सुटका आणि चौथ्या टप्प्यातील रोड शो

दिल्ली मद्य धोरणातील कथित घोटाळ्या प्रकरणी आपचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगवास झाला. सर्वोच्च न्यायालयाने 1 जूनपर्यंत अरविंद केजरीवाल यांची अंतरिम जामिनावर सुटका केली. 2 जून रोजी त्यांनी आत्मसमर्पण करून तुरुंगात परतण्याचे आदेश कोर्टाने दिले. निवडणूक प्रचारासाठी न्यायालयाने त्यांना जामीन दिला. केजरीवाल यांच्या सुटकेनंतर इंडिया आघाडीने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले. काँग्रेस, टीएमसी ते द्रमुकने हा न्यायाचा विजय असल्याचे म्हटले. केजरीवाल यांच्या सुटकेनंतर आप कार्यकर्त्यांनी त्यांच्या नेत्याचे पूर्ण उत्साहात स्वागत केले. सुटकेनंतर अरविंद केजरीवाल यांनी दुसऱ्या दिवशी कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात पूजा केली. त्यानंतर दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातील आपचे उमेदवार साही राम पहेलवान यांच्या समर्थनार्थ रोड शो केला. ‘तुरुंगातून सुटल्यानंतर मी थेट तुमच्याकडे आलो आहे. मला दिल्लीच्या लोकांची खूप आठवण यायची. ज्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली आणि आशीर्वाद पाठवले त्या करोडो लोकांचे मला आभार मानायचे आहेत असे केजरीवाल यावेळी म्हणाले होते.

पाचवा टप्प्यात शेअर बाजाराबाबत पंतप्रधानांचे मोठे भाकीत

पाचव्या टप्प्यातील मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर बाजाराबाबत मोठे भाकीत केले. ‘4 जूनच्या निकालानंतर सेन्सेक्स इतका स्विंग होईल की शेअर बाजारातील कार्यक्रम करणारेही थकतील. त्यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात सेन्सेक्सने 25 ते 75 हजारांपर्यंत मोठा प्रवास केला. लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जूनला येतील. त्यावेळी आठवडाभरात भारताचा शेअर बाजार आणि त्यांचे प्रोग्रामिंग करणारे सगळे थकून जातील, असा दावा मोदी यांनी केला. तसेच, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे शेअर्स कुठे पोहोचले आहेत. हा साठा घसरणारच होता. आता शेअर बाजारात त्यांचे भाव वाढत आहेत, असेही ते म्हणाले.

मतदान डेटा आणि फॉर्म 17C चा सहावा टप्पा

लोकसभा निवडणुकीत झालेल्या अंतिम मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यास निवडणूक आयोगाने विलंब केला या मुद्द्यावरून विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. निवडणूक आयोगाने ‘मतदान केंद्रनिहाय मतदानाच्या टक्केवारीच्या डेटाचा ‘अंदाधुंद खुलासा’ आणि तो वेबसाइटवर पोस्ट केल्याने निवडणूक यंत्रणेत गोंधळ उडेल असे सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. त्याचप्रमाणे मतदान केंद्रावर टाकलेल्या मतांची संख्या देणारा फॉर्म 17C चा तपशील सार्वजनिक केला जाऊ शकत नाही. यामुळे संपूर्ण निवडणूक व्यवस्थेत अराजकता निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रतिमांशी छेडछाड होण्याची शक्यता वाढते असेही आयोगाने म्हटले.

एका स्वयंसेवी संस्थेने ही याचिका दाखल केली होती. आयोगाने लोकसभेच्या प्रत्येक टप्प्यासाठी मतदान संपल्यानंतर 48 तासांच्या आत वेबसाइटवर मतदान केंद्रनिहाय डेटा अपलोड करण्याचे निर्देश आयोगाला द्यावेत, अशी विनंती या याचिकेमधून करण्यात आली होती. त्यावर निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या प्रतिज्ञापत्रात 25 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या पाच टप्प्यात झालेल्या मतदानाची लोकसभा मतदारसंघनिहाय आकडेवारी जाहीर केली असे म्हटले. तसेच, मतदानाच्या संख्येत कोणताही बदल शक्य नाही असेही स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.

मॅरेथॉन निवडणूकीचा प्रचार संपला…

लोकसभा निवडणुकीत एकीकडे विरोधकांचे मोठे दिग्गज प्रचारात व्यस्त असताना दुसरीकडे भाजपच्यावतीने पंतप्रधान मोदी यांनी मॅरेथॉन निवडणूक प्रचार केला. पंतप्रधान मोदी यांनी सात टप्प्यांत 206 निवडणूक कार्यक्रम घेतले. 80 हून अधिक मीडिया चॅनेल, वर्तमानपत्रे, YouTubers आणि ऑनलाइन मीडियाला त्यांनी मुलाखती दिल्या. संपूर्ण निवडणूक प्रचारादरम्यान मोदी सर्वांशी स्पर्धा करताना दिसले. आंध्र प्रदेशातील पलानाडू येथून पंतप्रधानांनी निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आणि त्याचा समारोप 30 मे रोजी पंजाबमधील होशियारपूर येथे केला. 75 दिवसांच्या कालावधीत मोदी यांनी 180 रॅली आणि रोड शो केले. दररोज सरासरी दोनहून अधिक रॅली आणि रोड शोमध्ये ते सहभागी झाले होते. तर, निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी 15 फेब्रुवारी ते 15 मार्च दरम्यान 15 सभा घेतल्या होत्या.