“महाराष्ट्रातील विकासाच्या दुश्मनांना सत्तेच्या बाहेर ठेवा”, पंतप्रधान मोदींचा सल्ला

| Updated on: Oct 05, 2024 | 7:19 PM

महायुती सरकारने मुंबई एमएमआरमध्ये ३० हजार कोटी पेक्षा अधिक रकमेची विकासकामे करत आहोत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

महाराष्ट्रातील विकासाच्या दुश्मनांना सत्तेच्या बाहेर ठेवा, पंतप्रधान मोदींचा सल्ला
Follow us on

PM Narendra Modi On Opposition Leader : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच ठाण्यातील विविध विकास कामांचे लोकापर्ण करत त्याचा आढावा घेतला. यावेळी पंतप्रधान मोदींनी जोरदार भाषण केले. यावेळी मोदींनी महाविकासाआघाडीवर जोरदार निशाणा साधला. यावेळी त्यांनी मुंबई-ठाण्यातील विकास कामांबद्दलही भाष्य केले.

“आज एक मोठी आनंदाची बातमी घेऊन मी महाराष्ट्रात आलो आहे. केंद्र सरकारने आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. ही केवळ मराठी आणि महाराष्ट्राचाच सन्मान आहे असं नाही, देशाला ज्ञान, दर्शन, अध्यात्म आणि साहित्याची समृद्धी संस्कृती दिली त्या परंपरेचा हा सन्मान आहे. देश आणि जगातील मराठी भाषिकांचं मी अभिनंदन करतो. नवरात्रीत मला एकानंतर एक अनेक विकास कामाच्या लोकार्पण आणि शिलान्यासाचं सौभाग्य मिळत आहे. ठाण्याच्या आधी वाशिमला होतो. तिथे देशातील साडेनऊ कोटी शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी दिला. अनेक विकास कामांचं लोकार्पण केलं”, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

“महाराष्ट्राच्या विकासाची ही सुपर फास्ट स्पीड आहे. आजचा दिवस महाराष्ट्राच्या उज्वल भविष्याची झलक देत आहे. महायुती सरकारने मुंबई एमएमआरमध्ये ३० हजार कोटी पेक्षा अधिक रकमेची विकासकामे करत आहोत. एकीकडे महायुती काम करत आहे. तर महाविकास आघाडी विरोध करत आहे. महाविकासआघाडी ही विकासाला विरोध करणारी आघाडी आहे”, अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.

विकासाच्या या दुश्मनांना सत्तेच्या बाहेर ठेवा

“त्यांनी अहदाबाद मुंबई बुलेट ट्रेनचं काम पुढे सरकू दिलं नाही. त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील पाण्याशी संबंधित प्रकल्पही बंद पाडलं. लोकांची तहान भागवण्यासाठी सुरू झालेले प्रकल्प त्यांनी थांबवले. तुमची प्रत्येक कामे ते रोखत होते. आता त्यांना रोखा. महाराष्ट्रातील विकासाच्या या दुश्मनांना सत्तेच्या बाहेर ठेवा. शेकडो मैल दूर ठेवा”, असा सल्ला नरेंद्र मोदी यांनी दिला.

सोबत मिळून महाराष्ट्राचं स्वप्न साकार करु

“महाराष्ट्राला चांगल्या सरकारची गरज आहे. स्वच्छ सरकारची गरज आहे. आम्ही अनेक विकासकामे केली आहेत. आपल्याला देशाला खूप पुढे न्यायचं आहे. राज्यातील नागरिक एनडीएच्या सोबत आहे. आपण सोबत मिळून महाराष्ट्राचं स्वप्न साकार करु”, असे नरेंद्र मोदी म्हणाले.