परळी : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (17 ऑक्टोबर) परळीत येणार आहेत. परळीत (PM Narendra Modi in Parli) भाजपकडून पंकजा मुंडे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे या दोघा भावंडात थेट लढत होत आहे. यावरुन धनंजय मुंडे यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. “मोदीजी तुमच्या मंत्र्यांनी केलेला विकास पाहायचा असेल, तर परळीला येताना हेलिकॉप्टरऐवजी अंबाजोगाई रस्त्याने या,” असा टोला धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना लगावला.
“मोदीजी तुम्ही उद्या परळीत येताय तुमचे स्वागत! एकच इच्छा आहे, परळीला येताना हेलिकॉप्टरऐवजी अंबाजोगाई रस्त्याने या. तुमच्या मंत्र्यांनी केलेला ‘विकास’ दिसेल.” अशी धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर, “चंद्रयान-2 मोहिमेदरम्यान तुम्ही 4 तास थेट प्रक्षेपण पाहिले, प्रत्यक्ष अनुभव परळी-अंबाजोगाई प्रवासादरम्यान घ्या. शुभेच्छा!” असा खोचक टोला त्यांनी पंकजा मुंडेंना लगावला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या उद्या राज्यात तीन प्रचारसभेचे आयोजन केले आहे. दुपारी साधारण 12 वाजता मोदींची परळीत सभा आहे. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता सातारा आणि नंतर संध्याकाळी 4.30 च्या सुमारास पुण्यात सभा होणार आहे. या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान मोदींच्या सभेच्या निमित्ताने परळीत संपूर्ण वातावरण मोदीमय (PM Narendra Modi in Parli) झालं आहे.
परळीत प्रतिष्ठेची लढत
पंकजा मुंडे राजकीय खेळी करण्यात आतापर्यंत धनंजय मुंडेंवर वरचढ ठरल्या असल्या तरी खऱ्या लढाईची प्रतिक्षा आहे. धनंजय मुंडेंनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करत भावनिक साद घालणं सुरु केलंय. तर पंकजा मुंडे दिवसभर राज्यभरातील भाजप उमेदवारांचा प्रचार करुन सायंकाळी परळीत स्वतःचा प्रचार करतात. धनंजय मुंडेही परळीत तळ ठोकून आहेत. त्यामुळे या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलंय.
पंतप्रधान मोदींची सभा
भाजपकडून राज्यात सभांचा धडाका सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची परळीत 17 तारखेला सभा होईल. परळीतील मोदींच्या सभेची जय्यत तयारी सुरु आहे. दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारासाठी ज्या मैदानात सभा घेतली होती, त्याच मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही सभा होणार आहे.