अहमदाबाद : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुजरातमधील मोटेरा स्टेडियममधून (Donald Trump Motera stadium speech) संबोधित केलं. यावेळी त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरुन कौतुक केलं. शिवाय भारत-अमेरिका मैत्री आणि दृढ होईल असा विश्वास व्यक्त केला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नमस्ते म्हणत भाषणाला सुरुवात केली. ट्रम्प म्हणाले की, “भारतात येणे अभिमानास्पद आहे. नरेंद्र मोदी हे चॅम्पियन आहेत, जे भारताला विकासाच्या दिशेने पुढे नेत आहेत. मी आणि मेलानिया ट्रम्प 8000 मैलांचा प्रवास करुन येथे पोहोचलो आहे. अमेरिका हा भारताचा मित्र आहे, अमेरिका भारताचा आदर करतो”. (Donald Trump Motera stadium speech)
पंतप्रधान मोदींनी आयुष्यात कठोर परिश्रम केले, चहावाला म्हणून कामाला सुरुवात केली, ते आपल्या वडिलांच्या चहाच्या दुकानात काम करत होते. आज प्रत्येकाचे पंतप्रधान मोदींवर प्रेम आहे. आज पंतप्रधान मोदी हे भारताचे सर्वात प्रख्यात आणि प्रसिद्ध नेते आहेत. गेल्या वर्षी 60 कोटीहून अधिक लोकांनी पंतप्रधान मोदी यांना मतदान केले आणि त्यांनी भारतातील सर्वात मोठा निवडणूक विजय मिळवला, असं ट्रम्प म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “5 महिन्यांपूर्वी अमेरिकेने पंतप्रधान मोदींचे स्वागत केले होते, आज भारत आमचं स्वागत करत आहे, जे आमच्यासाठी आनंददायक आहे. आज आपण जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियममध्ये आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमचे स्वागत केले, आजपासून भारत आमचा सर्वात महत्वाचा मित्र असेल”.
डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदी सरकारच्या काळातील उज्ज्वला योजना, इंटरनेट सुविधा, पंतप्रधान आवास योजना यासारख्या योजनांचा उल्लेख केला. आज भारत एक मोठी शक्ती म्हणून उदयास येत आहे, जी या शतकातील सर्वात मोठी बाब आहे. शांततापूर्ण देश म्हणून आपण हे साध्य केले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले की पंतप्रधान मोदी केवळ गुजरातचाच नव्हे तर संपूर्ण भारताचा अभिमान आहेत. ते अशक्य ते शक्य करु शकतात. आज पंतप्रधानांच्या नेतृत्वात भारत प्रगती करीत आहे आणि ही विकास यात्रा जगासाठी एक उदाहरण आहे. आज भारत अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रातील एक प्रमुख शक्ती बनला आहे. एका दशकात भारताने दारिद्र्यरेषेमधून अनेक कोटी लोकांना बाहेर काढले.
अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले की, भारत दरवर्षी 2 हजारहून अधिक चित्रपट तयार करतो. बॉलिवूड सिनेमांचं जगभरात स्वागत केले जाते. लोक भांगडा-संगीताचा उल्लेख करतात, लोकांना दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे अर्थात डीडीएलजेदेखील आवडतो. भारताने सचिन, विराट कोहलीसारखे खेळाडू जगाला दिले.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, भारत आज आपल्या लोकांवर विश्वास ठेवतो, ज्यामुळे अमेरिका आणि भारत एकसारखे आहेत. अमेरिका आणि भारतामध्ये बरीच समानता आहेत, ज्यात प्रत्येक व्यक्तीला समान मानले जाते. यावेळी अमेरिकन राष्ट्रपतींनी स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी यांचा उल्लेखही केला.
अमेरिकेत राहणारे बरेच व्यापारी गुजरातमधून येतात, अशा परिस्थितीत अमेरिकेच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल त्या सर्वांचे आभार मानतो, असं ट्रम्प म्हणाले.
यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी होळी, दिवाळीसारख्या सणांचा उल्लेख केला. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, आज हिंदू, जैन, मुस्लिम, शीख यांच्यासह अनेक धर्मांचे लोक भारतात राहतात, इथे डझनभर भाषा बोलल्या जातात. असे असले तरी, इथे सर्वजण एक शक्तीसारखे जगतात. अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांनी अमेरिकेच्या विकासात मोठी भूमिका बजावली आहे, असं त्यांनी नमूद केलं.