पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या पुण्यात जाहीर सभा आयोजित करण्यात (PM Narendra Modi Pune) आली आहे. पुण्यातील सप महाविद्यालयाच्या मैदानावर ही सभा होणार आहे. या सभेसाठी काही दिवसांपूर्वी मैदानावरील 20 ते 25 झाडं कापण्यात आली होती. त्यानंतर आता पंतप्रधानाच्या ताफ्याला व्यासपीठापर्यंत जाण्यासाठी खेळाच्या मैदानावर डांबर टाकून रस्ता तयार करण्यात आला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या सप महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी खेळाच्या मैदानावर चक्क डांबरीकरण करण्यात आलं आहे. डांबरचा वापर करुन खेळाच्या मैदानावर डांबरी रस्ता तयार करण्यात आला आहे. साधारण 50 फूट लांबीचा हा रस्ता बनवण्यात आला आहे. मोदींच्या गाडीच्या ताफ्याला व्यासपीठापर्यंत जाण्यासाठी हा डांबरी रस्ता बनवला असल्याचे बोललं (PM Narendra Modi Pune) जात आहे.
यापूर्वी या मैदानात व्यासपीठ उभारण्याच्या कामात अडथळा येत असल्याने झाडं तोडण्यात आली होती. यातील काही झाडे ही निम्म्यापर्यंत तोडली होती. तर काही झाडांचा केवळ बुंधा शिल्लक आहे. तर काही झाडे पूर्णपणे कापण्यात आली आहे. अशी जवळपास 20 ते 25 झाडे तोडण्यात आली आहे. ही झाड धोकादायक असल्याने परवानगी घेऊन तोडल्याचे शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ऍड. एस. के. जैन यांनी सांगितले.
दरम्यान याआधीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जनादेश यात्रेदरम्यान सिंहगड रस्त्यावरील झाडं तोडण्यात आली होती. याबाबतची तक्रार केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले होते. पण याबाबत पुढे कोणतीही कारवाई झाली नाही.