वाजपेयींनी गोपीनाथ मुंडेंसाठी सभा घेतलेल्या मैदानात मोदींची पंकजांसाठी सभा

| Updated on: Oct 12, 2019 | 5:59 PM

दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारासाठी ज्या मैदानात सभा घेतली होती, त्याच मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Parli Rally) यांचीही सभा होणार आहे.

वाजपेयींनी गोपीनाथ मुंडेंसाठी सभा घेतलेल्या मैदानात मोदींची पंकजांसाठी सभा
Follow us on

बीड : ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी परळीत (PM Modi Parli Rally) येणार आहेत. परळीत भाजपकडून पंकजा मुंडे, तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे या दोघा भावंडात थेट लढत होत आहे. 17 तारखेला मोदी परळीमध्ये पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ येत येतायत. या निमित्ताने परळीत पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. कारण, दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रचारासाठी ज्या मैदानात सभा घेतली होती, त्याच मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Parli Rally) यांचीही सभा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी जागा निश्चित करण्यात आली आहे. वैद्यनाथ कॉलेजसमोरील मैदानात ही सभा होणार आहे. सभेसाठी पोलीस प्रशासनाकडून गोपीनाथ गड आणि वैद्यनाथ मंदिर या दोन जागांची पाहणी करण्यात आली होती. 1999 ला वाजपेयींनी गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी याच मैदानात सभा घेतली होती.

पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी वैद्यनाथ कॉलेजसमोरील भव्य मैदानात तयारी सुरु झाली आहे. अंदाजे 25 एकरातील या जागेत तीन हेलिकॉप्टरसाठी तीन हेलिपॅड अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र सिंघल यांनी गुरुवारी मैदानाची पाहणी केली. त्यांच्यासोबत बीडचे पोलीस अधीक्षक हर्ष पोदारही उपस्थित होते.

धनंजय मुंडेंचा पंकजा मुंडेंवर निशाणा

पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी येत असल्यामुळे धनंजय मुंडे यांनीही निशाणा साधलाय. “उमेदवारी अर्ज दाखल करायच्या दिवसापासून भाजपने जो धसका घेतलाय, ते आणखी त्यातून बाहेर निघालेले नाहीत. त्यांना वाटलं की मोदी आल्याशिवाय आपल्याला कोणी वाचवू शकत नाही. हे कळाल्यावर मी भाजपच्या एका मोठ्या नेत्याला म्हणालो, मोदी मागच्या महिन्यात अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचाराला गेले होते. 17 ला मोदी येत आहेत, 19 ला ट्रम्प जरी आणले तरी विजय कुणीही रोखू शकत नाही अशी परिस्थिती आहे”, असं धनंजय मुंडे म्हणाले.

परळीत प्रतिष्ठेची लढत

पंकजा मुंडे राजकीय खेळी करण्यात आतापर्यंत धनंजय मुंडेंवर वरचढ ठरल्या असल्या तरी खऱ्या लढाईची प्रतिक्षा आहे. धनंजय मुंडेंनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची करत भावनिक साद घालणं सुरु केलंय. तर पंकजा मुंडे दिवसभर राज्यभरातील भाजप उमेदवारांचा प्रचार करुन सायंकाळी परळीत स्वतःचा प्रचार करतात. धनंजय मुंडेही परळीत तळ ठोकून आहेत. त्यामुळे या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलंय.