मुंबई : दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे शिवसेनेचा दसरा(Dussehra Melawa) मेळावा घेणार आहेत. या अनुषंगाने शिवसैनिकांकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. शिवाजी पार्क परिसरात ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जोरदार पोस्टरबाजी केली आहे. ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी शिवाजी पार्क परिसरात लावलेलं पोस्टर पोलिसांनी हटवले आहेत.
ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर लावलेले पोस्टर वादग्रस्त असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हे पोस्टर वादास कारणीभूत ठरण्याची चिन्ह असल्याचे म्हणत मुंबई पोलिसांनी हे पोस्टर हटवले आहेत.
पोस्टरमध्ये असलेला काही मजकूर हा एका राजकीय पक्षाच्या झेंड्याशी साधर्म्य असलेला होता असा दावा पोलिसांनी केला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी संबंधित पोस्टर हटवले आहेत.
शिंदे गट बीकेसीतील मैदानावर दसरा मेळावा घेत आहे. तर हायकोर्टाने ठाकरे गटाला शिवजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी दिली आहे.
दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी चढाओढ पहायला मिळत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनही सज्ज झाले आहेत. मेळाव्याच्या दोन्ही ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त पहायला मिळत आहे.