मुंबई | 9 डिसेंबर 2023 : राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केला. मात्र, प्रफुल्ल पटेल यांच्यावरून फडणवीस यांना घेरणं सुरूच आहे. खासदार संजय राऊत यांनी मलिक आणि पटेल यांच्यासाठी देशभक्तीची व्याख्या वेगळी आहे का? असा रोखठोक सवाल केला. तर राज ठाकरे यांनीही ट्विटमधून फडणवीसांना डिवचलं. सत्ता येते जाते पण देश महत्वाचा असं म्हणत मलिकांवर देशद्रोह्यांशी संबंधांचे आरोप असल्यामुळे त्यांना महायुतीमध्ये घेता येणार नाही अशी भूमिका फडणवीस यांनी घेतली. मात्र, राऊतांनी महायुती सरकारमधील इतर मंत्री आणि नेत्यांची यादीच वाचली. प्रफुल्ल पटेल, भावना गवळी, प्रताप सरनाईक, हसन मुश्रीफ यांच्यासाठी देशभक्ती वेगळी आणि नवाब मलिक यांच्यासाठी वेगळी अशी आहे का? असा सवाल राऊतांनी केला.
मलिक यांच्यावर दाऊदशी संबंधित 1993 च्या बॉम्बस्फोटातील गुन्हेगारांकडून जमीन खरेदीचा आरोप आहे. प्रफुल्ल पटेल यांच्यावर दाऊदचा हस्तक इकबाल मिरचीसोबत व्यवहाराचा आरोप आहे. हसन मुश्रीफांवर अप्पासाहेब नलावडे साखर कारखाना खरेदी व्यवहारात शंभर कोटींचा घोटाळ्याचा आरोप आहे. भावना गवळींवर महिला उत्कर्ष प्रतिष्ठान ट्रस्टमध्ये घोटाळा झाल्याचा ED ला संशय आहे. आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर NACL घोटाळा प्रकरणात ED ची कारवाई झाली आहे.
यावरून संजय राऊत यांनी भाजपला घेरलंय. भारतीय जनता पक्ष हा नैतिकतेचे फुगे फुगवतो ना छाती फुटेपर्यंत. त्यांच्याकडे नैतिकता औषधाला तरी शिल्लक आहे का? म्हणून आज आम्ही म्हटलंय यांच्या नैतिकतेचं ऑडीट केलं पाहिजे. नवाब मलिक प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र लिहिण्याचं जे काय एक-एक नाटक केलेलं आहे. बरं का हा ड्रामा आहे ड्रामा अशी टीका त्यांनी केलीय.
तर राऊत यांच्या आरोपांना उत्तर देताना भाजप आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मी पहिल्या दिवसापासून भीती व्यक्त करतोय की आदित्य ठाकरे दिशा केसमध्ये अटक होण्याआधी देश सोडून जाऊ शकतो. आता क्लायमेट कंट्रोल कार्यक्रमाच्या निमित्ताने दुबईला जाऊन बसला आहे. अधिवेशनामध्ये दिसत नाही. याचाही अर्थ दुसरा होऊ शकतो की आदित्य ठाकरेंनी देश सोडून पळालेला आहे. मुंबई पोलिसांनी, महाराष्ट्र पोलिसांनी या सगळ्या गोष्टीवर लक्ष घालावं असा प्रहार राणे यांनी केलाय.
संजय राऊतांनी मलिकांवरून भाजपाला घेरलं असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा फडणवीसांना टोले लगावले आहेत. फोटोसह ट्विट करुन राज ठाकरे यांनी जनता धडा शिकवेल असं म्हटलं. इतका स्नेहसंबंध आहे तर पत्र का लिहावं लागलं? सुहास्य वदन दाखवण्याची ही कोणती धडपड? नवाबचा जबाब द्या की नका देऊ. पण तुम्ही घातलेल्या राजकीय ढोंगीपणाचा नकाबचा जवाब. तुम्हाला जनतेला द्यावाच लागेल. नाहीतर जनता अगदी योग्य वेळी त्यांना गृहीत धरणाऱ्याना धडा शिकवेल असे ट्विट राज ठाकरे यांनी केलंय. दुसऱ्या ट्विटमध्ये राज ठाकरे यांनी असं म्हटलंय की हिंदुत्व श्रीखंडात देशद्रोह्यांची मिरची टाकणं महायुतीच्या प्रफुल्लित कार्यकर्त्यांना पटेल आणि हो नवाबसाहिब जवाब पटेल असाच द्या.
राज ठाकरे यांच्या या ट्विटला भाजप नेते आशिष शेलार यांनी उत्तर दिलंय. या ट्विटचं उत्तर देण्याची गरज नाही कारण ज्यांची भूमिका काय आहे हेच अजून महाराष्ट्राला कळलेलं नाही. ज्यांच्या पक्षाचा जन्म का झाला? त्यांच्या पक्षाची धोरण प्रथम काय होती पहिला झेंडा काय होता? नंतरचा झेंडा काय झाला? मग भूमिका मराठीवरून अन्य ठिकाणी का बदलली? भूमिका मोदींच्या बरोबर का होती? मोदी विरोधी का झाली? सगळ्याच विषयात धरसोड करणाऱ्यांनी त्यांच्या अगोदर भूमिकांची यादी काय आहे हे स्पष्ट करावी मग दुसऱ्यांना प्रश्न विचारावे अशी टीका त्यांनी केलीय. तूर्तास मलिकांना भाजपनं विरोध केलाय. तर, प्रफुल्ल पटेल चालतील अशीच भाजपची भूमिका आहे. मात्र, ED च्याच कारवायांची आठवण करुन देत विरोधक भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न करताहेत हे खरं.