दंतेवाडा, छत्तीसगड : नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भाजप आमदारासह पाच जवान शहीद झाले. छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये ही घटना घडली. भाजप आमदार भीमा मंडावी यांचा ताफा ज्या रस्त्याने जात होता, त्या रस्त्यावर भूसुरुंग लावून स्फोट घडवण्यात आला, ज्यामध्ये आमदार आणि पाच जवानांचाही मृत्यू झाला. भीमा मंडावी हे छत्तीसगड विधानसभेत भाजपचे उपनेते होते.
छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत भाजपने सपाटून मार खाल्ला होता. भाजपला फक्त 15 जागा जिंकता आल्या. बस्तरमध्ये जेव्हा भाजपचा सुपडासाफ झाला होता, तेव्हा भीमा मंडावी यांनी दंतेवाडा ही एकमेव जागा जिंकली होती. सर्वात अगोदर त्यांनी बस्तर टायगर अशी ओळख असलेले काँग्रेसचे दिग्गज नेते महेंद्र कर्मा यांचा पराभव केला होता. या निकालानंतर मंडावी यांना भाजपमध्ये महत्त्व प्राप्त झालं.
राजकीय कारकीर्द
भीमा मंडावी हे अगोदर बजरंग दलाचे कार्यकर्ते होते. या संघटनेत त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी पाहिली. याच काळात 2008 मध्ये ते महेंद्र कर्मा यांना हरवून राज्याच्या पटलावर आले. झीरम घाटी नक्षलवादी हल्ल्यात महेंद्र कर्मा यांच्या मृत्यूनंतर सहानुभूतीची लाट होती. यात महेंद्र कर्मा यांच्या पत्नी देवती कर्मा 2013 च्या निवडणुकीत जिंकून आल्या. पण 2018 च्या निवडणुकीत मंडावी यांनी देवती कर्मा यांचा पराभव केला. बस्तरमधील 12 पैकी फक्त एक जागा मंडावी यांच्या रुपाने भाजपला मिळाली होती. याचमुळे मंडावी यांची उपनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली.
आधी पत्नीचा मृत्यू, नंतर मुलीची आत्महत्या
भाजप आमदार भीमा मंडावी यांच्या राजकीय कारकीर्दीचा आलेख चढताच असला तरी वैयक्तिक जीवनात त्यांनी अनेक संकटांचा सामना केला. 2012 मध्ये एका अपघातात मंडावी यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. पुढच्याच वर्षी म्हणजे 2013 मध्ये मुलीनेही आत्महत्या केली. यानंतर दोन वर्षांनी मंडावी यांनी दुसरं लग्न केलं. मंडावी यांना पहिल्या पत्नीचा एक आणि दुसऱ्या पत्नीचे तीन असे एकूण चार मुलं आहेत.
संबंधित बातम्या :