मुंबई : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी अखेर संपली आहे. नुकंतच देशात सात टप्प्यातील मतदान पार पडलं. निवडणुकीपूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचारबाजी केली. यात फेसबुक, गुगल यांसारख्या डिजीटल माध्यमांचा सर्वाधिक वापर करण्यात आला. राजकीय पक्षांनी फेब्रुवारी महिन्यांपासून ते मे महिन्यापर्यंत सोशल मीडियावरील जाहिरातबाजीसाठी जवळपास 53 कोटी रुपये खर्च केले आहेत. नुकतंच फेसबुकने याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार सत्ताधारी भाजपने सोशल मीडियावर सर्वाधिक खर्च केला आहे.
फेसबुक अँड लायब्ररी यांनी दिलेल्या अहवालानुसार, फेब्रुवारी 2019 च्या सुरुवातीपासून 15 मे पर्यंत फेसबुकला 1 कोटी 21 लाख छोट्या-मोठ्या जाहिराती मिळाल्या आहेत. या जाहिरातींसाठी सर्व राजकीय पक्षांनी तब्बल 26 कोटी 5 लाख रुपये खर्च केलेत. त्याशिवाय गुगल, यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया माध्यमांवर आतापर्यंत 14 हजार 837 जाहिराती झळकल्या आहेत. या जाहिरातींसाठी राजकीय पक्षांतर्फे 27 कोटी 36 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
या अहवालानुसार सत्ताधारी भाजपने फेब्रुवारी ते मे महिन्याच्या कालावधीत 2500 जाहिराती दिल्या आहेत. या जाहिरातींमागे 4 कोटी 23 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. त्यात माय फर्स्ट वोट फॉर मोदी, भारत के मन की बात, नेशन विद मोदी यांसारख्या फेसबुक पेजवरील जाहिरातींसाठी चार कोटी रुपये खर्च केला आहे. विशेष म्हणजे गुगलच्या विविध प्लॅटफॉर्मवर जाहिरातबाजीसाठी भाजपने 17 कोटींचा खर्च केला आहे. यानुसार सत्ताधारी भाजपने यंदाच्या निवडणुकीदरम्यान 25 कोटींहून अधिक खर्च केल्याचं स्पष्ट होत आहे.
त्याशिवाय काँग्रेसने निवडणुकीच्या काळात फेसबुकवर 3 हजार 686 जाहिराती दिल्या आहे. यासाठी त्यांनी 1 कोटी 46 लाख रुपये खर्च केलेत. तर काँग्रेससह इतर घटक पक्षांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या 425 जाहिराती केल्यात. यासाठी त्यांनी 2 कोटी 71 लाख रुपये खर्च केले.
फेसबुकने दिलेल्या आकडेवारीनुसार तृणमूल काँग्रेसने यंदा निवडणुकीदरम्यान सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहिरातबाजीसाठी 29 लाख 28 हजार रुपये खर्च केलेत. तर आम आदमी पार्टी (आप) ने फेसबुकवर 176 जाहिराती दिल्या आहेत. या जाहिरातींसाठी आपने फेसबुकला 13 लाख 62 हजार रुपये दिले आहेत. त्याशिवाय आपने अर्बन डिजीटल सॉल्यूशनद्वारे काही जाहिराती केल्या आहेत. या जाहिरातींचा खर्च साधारण 2 कोटी 18 लाख रुपये आहे.