बुलढाणा : अक्षयतृतीयेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज जिल्ह्यातील प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी करण्यात आली. राजा कायम असेल, पण डळमळीत राहील अशी शक्यता घटमांडणीवर करण्यात आली. यावेळी चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज यांनी ही भविष्यवाणी केली.
भविष्यवाणीत सांगण्यात आले, “यावर्षी पाऊस सर्वसामान्य असेल. चाऱ्याची टंचाई निर्माण होईल. त्याचबरोबर देशासमोर आर्थिक चणचण जाणवेल.” संरक्षण क्षेत्रावर भविष्यवाणी करताना घुसखोरी कायम राहील, मात्र संरक्षण खाते चोख प्रत्युत्तर देईल, असेही सांगण्यात आले.
एकूणच भविष्यवाणीत थेट राजकीय भाष्य करण्यास पुंजाजी महाराजांनी नकार दिला. मात्र, देशाच्या पंतप्रधानांबाबत त्यांनी अप्रत्यक्ष भाष्य केले. राजा कायम असेल, पण डळमळीत राहील, अशी राजकीय भविष्यवाणी त्यांनी घटमांडणीवर केली. पुंजाजी महाराजांच्यावतीने शारंगधर महाराजांनी त्यांच्या भविष्यवाणीची घोषणा केली.
शेतीविषयक भविष्यवाणी
“यावर्षी ज्वारीचे पीक सर्वसाधारण येईल. तुरीचे पीक चांगले येईल. मुग, उडीद, तीळ, तांदुळ, जवस ही पीकं सर्वसाधारण येतील. मात्र, पिकपाण्यावर रोगराई पडेल. पाऊस जून महिन्यात साधारणच राहिल. तसेच पेरणी सर्व ठिकाणी होऊ शकणार नाही. मात्र, जुलै महिन्यात चांगला पाऊस पडेल. ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी-जास्त होईल. सप्टेंबर महिन्यात लहरी स्वरुपाचा पाऊस पडेल. चारा पाण्याची टंचाई देखील संपून जाईल.”