बंगळुरु : कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसने सत्तास्थापन केल्यापासून सरकार कधीही पडू शकतं असा दावा भाजपकडून सातत्याने केला जातो. काँग्रेस आमदारानेही आता जाहीरपणे सरकारविषयी आणि पक्षाविषयी राग बोलून दाखवलाय. एक्झिट पोलचे आकडे आल्यानंतर कर्नाटकातील काँग्रेस आमदार रोशन बेग यांनी पक्षावर सनसनाटी आरोप केले. शिवाय आमच्या सरकारमध्ये मंत्रीपदं विकली गेली असल्याचा सनसनाटी आरोपही त्यांनी केला. यासाठी त्यांनी काँग्रेसचे महासचिव केसी वेणुगोपाल यांना जबाबदार धरलंय.
19 मे रोजी आलेल्या एक्झिट पोलमध्ये एनडीएचा बहुमताने विजय होत असल्याचं दाखवलंय. शिवाय कर्नाटकातील 28 जागांपैकी भाजप 21 ते 25 जागा जिंकत असल्याचा एक्झिट पोल एक्सिस माय इंडियाने दाखवलाय. यावर रोशन बेग यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. जेडीएससोबत तडजोड करुन सत्ता स्थापन करणे आणि मंत्रीपदं देण्यातील गोंधळ यावरुन रोशन बेग यांनी केसी वेणुगोपाल यांच्यावर गंभीर आरोप केले.
मंत्रीपदं विकण्यात आली. यासाठी मी कुमारस्वामी यांना जबाबदार कसा धरु शकतो? जेडीएस सरकार स्थापन करुच शकत नव्हते. माजी मुख्यमंत्री सिद्धरमैय्या पहिल्या दिवसापासून सांगत होते की मीच पुन्हा मुख्यमंत्री होणार आहे. पण तुम्ही त्यांच्या दारात गेलात आणि सत्तास्थापन करण्याची संधी दिली, असं म्हणत रोशन बेग यांनी केसी वेणुगोपाल यांच्यावर गंभीर आरोप केले.
या सर्व परिस्थितीचं मूळ कारण केसी वेणुगोपाल असल्याचं रोशन बेग म्हणाले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याविषयी मला वाईट वाटतं. केसी वेणुगोपालसारखे लोक, सिद्धरमैय्या यांच्यासारखे उद्धट लोक आणि गांडू राव (कर्नाटक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष) यांच्या फ्लॉप शोचा हा परिपाक आहे, असं रोशन बेग म्हणाले.
दरम्यान, हे रोशन बेग यांचं वैयक्तिक मत असल्याचं स्पष्टीकरण काँग्रेसने दिलंय. कर्नाटकात फक्त एका मुस्लीम उमेदवाराला तिकीट देण्यात आलं होतं. ख्रिश्चन उमेदवार दिली नाही, असं म्हणतही रोशन बेग यांनी संताप व्यक्त केला. पण पक्षाने त्यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत.
पक्षाने पाठवलेल्या नोटीसलाही जाहीरपणे उत्तर
या वक्तव्यानंतर रोशन बेग यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. यावरुनही त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय. “मला पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे. पण मी ती नोटीस वाचणार नाही. कारण, ज्या व्यक्तीच्या चुका मी दाखवल्या, त्याच व्यक्तीने ही नोटीस पाठवली आहे. राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या उद्धटपणाविषयी न बोललेलं बरं. विरोधकांवर यांच्याकडून घोडेबाजार केल्याचा आरोप केला जातो, पण यांनी मंत्रीपदं कशी विकली यावर ते बोलत नाहीत. मी पक्ष स्तरावर होत असलेल्या गोष्टी लक्षात आणून दिल्या आहेत, पण त्याकडे डोळेझाक केली जात आहे. जाहीरपणे बोलण्यापूर्वी मी अंतर्गत तक्रारही केली आहे,” असं स्पष्टीकरण रोशन बेग यांनी नोटीस आल्यानंतर दिलंय.