मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आलेलं नाव, व्हायरल झालेल्या 11 ऑडिओ क्लिप, एक व्हिडीओ, भाजप नेत्यांनी लावून धरलेली राजीनाम्याची मागणी, राठोडांनी पोहरादेवी गडावर केलेलं शक्तीप्रदर्शन आणि शरद पवारांसह काँग्रेस नेत्यांचीही नाराजी यामुळे राठोड यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोहरादेवी गडावरुन राठोड यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही भूमिका बदलताना पाहायला मिळतेय. त्यामुळे राठोड यांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे.(Possibility of action against Sanjay Rathod)
पूजा चव्हाण प्रकरणात सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेते बॅलन्स भूमिका मांडत होते. शिवसेनेच्या नेत्यांना तर माध्यमांसमोर या प्रकरणी बोलण्यास मज्जाव करण्यात आला होता. आता संजय राठोड यांनी पोहरादेवी गडावर शक्तीप्रदर्शन केलं. त्यावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. आता हीच गर्दी राठोड यांना अडचणीची ठरु शकते. कारण, पवारांनंतर अन्य नेतेमंडळीही यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत संजय राठोडही उपस्थित होते. या बैठकीत राठोड यांच्याविषयी काहीही चर्चा झाली नाही. पोहरादेवी गडावर जी गर्दी झाली होती त्याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. अहवाल आल्यावर मुख्यमंत्री कारवाई करतील असं नवाब मलिक यांनी सांगितलं.
दरम्यान, शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आता राठोड प्रकरणात कारवाईची सर्व जबाबदारी शिवसेनेवर आणि पर्यायानं उद्धव ठाकरे यांच्यावर ढकलली गेली आहे. त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते उद्धव ठाकरे यांच्या निर्णयाकडे बोट दाखवत आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी तशी प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार यांनी मंगळवारी वर्षा बंगल्यावरुन जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या बैठकीचं कागदावरचं निमत्त कोरोनाचं होतं. मात्र, राठोड यांनी शक्तीप्रदर्शन केल्यानंतर अवघ्या काही तासांत ही बैठक झाल्यामुळए राठोडांचा विषय हा महत्वाचा मुद्दा बनला. पूजा चव्हाण प्रकरणात आलेलं संजय राठोड यांचं नाव, त्यांचं 15 दिवस गायब असणं, त्यावर भाजप नेत्यांचे गंभीर आरोप. तसंच पुणे पोलिसांच्या तपासावरही भाजपने उपस्थित केलेली शंका, त्यामुळे हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचं बनलं आहे. अशावेळी पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यातील ही बैठक म्हणजे राठोडांवरील कारवाईचं काऊंटडाऊन असेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळांत रंगताना पाहायला मिळत आहे.
संबंधित बातम्या :
EXCLUSIVE | पूजाच्या लॅपटॉपमधील व्हिडीओ टीव्ही 9 च्या हाती
Possibility of action against Sanjay Rathod