मुंबई : शिवाजी पार्कात शिवसेनेच्या सभेत एक ठाकरे होते. मात्र, त्याचवेळेला 3 इतर ठाकरे बीकेसी मैदानातल्या शिंदेंच्या मंचावर पोहोचले. महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब ठाकरेंनंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही जण सक्रीय आहेत. मात्र, शिवसेना फुटीनंतर इतर 3 ठाकरे अनेक दशकांनंतर काल राजकीय मंचावर दिसले. त्यामुळे आता थेट नसला तरी भविष्यात ठाकरेंमध्येही भावकीचा वाद निर्माण होईल अशी चर्चा रंगली आहे.
या मेळाव्याला उद्धव ठाकरेंचे मोठे बंधू जयदेव ठाकरे शिंदे गटाच्या मंचावर आले. उद्धव ठाकरेंच्या दुसरे बंधू दिवंगत बिंदुमाधव ठाकरेंचे पुत्र निहार ठाकरेंनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. उद्धव ठाकरेंच्या वहिनी स्मिता ठाकरेंनी शिंदे गटाच्या मेळाव्याला हजेरी लावली.
बहुदा या पिढीनं पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरेंचे दुसरे पुत्र जयदेव ठाकरेंना राजकीय मंचावर पाहिले. शिंदेंनंतर जयदेव ठाकरे स्टेजवर आले.
ठाकरेंनी हातात माईक घेतल्यावर ते सुद्धा शिंदे गटातून नवी सुरुवात करतात की काय, अशीही शंका अनेकांना होती. मात्र, त्या चर्चेला त्यांनी विराम देत शिंदेंना पाठिंबा दिला. जयदेव ठाकरेंनी शिंदेंना पाठिंबा तर दिला मात्र पुन्हा फेरनिवडणुका घेण्याचं आवाहनही केलं.
इतिहासात शिवसेना फुटीनंतर पहिलाच दसरा मेळावा झाला आणि इतिहासात पहिल्यांदाच जिथं पारंपरिक दसरा मेळावा व्हायचा त्या उद्धव ठाकरेंच्या मेळाव्यापेक्षा शिंदे गटाच्या मंचावर ठाकरे परिवाराच्या सदस्यांची संख्या जास्त होती.
शिवसेना याआधी अनेकदा फुटली. मात्र, यावेळची फूट अशाच काही गोष्टींनी वेगळी आहे.. बाळासाहेब ठाकरे हयात नसताना शिवसेनेतलं हे पहिलं बंड आहे. फक्त आमदार-खासदार नाहीत, तर बाळासाहेब ठाकरेंचे सेवेकरी थापापासून ते रक्ताच्या नात्याची लोकांनी शिंदेंना पाठिंबा दिलाय.
मात्र, ही मंडळी शिवसेना फुटीआधी राजकारणात सक्रीय होती का, हा सुद्धा मुद्दा आहेच. कालच्या मेळाव्यानं दोन्हीकडे मोठी गर्दी जमली. शेवटी फूट पक्षातली असो वा भावकीतली. कोण योग्य आणि कोण अयोग्य याचा फैसला दोन्हीकडे जमलेली ही गर्दीच करणार आहे.