मुंबईः आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यंग ब्लड आहे. अजून त्यांचं लग्नही झालेलं नाही. त्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारची वैयक्तिक टीका करणार नाहीत, असं स्पष्टीकरण एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे आमदार भरत गोगावले यांनी दिलंय. एकनाथ शिंदे गटाने उद्धव ठाकरेंविरोधात बंड केलं तरीही पक्ष नेतृत्वाविरोधी थेट आक्रमक बोलणं शिंदे गटातील आमदारांनी (Shivsena MLA) अगदी कटाक्षाने टाळलं आहे. बाळासाहेब ठाकरेंना देव मानतो, अन् उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंविरोधात बोलणार नाही, अशीच भूमिका त्यांनी घेतली आहे. मात्र बंड झालं, शिंदे गट भाजपसोबत सत्तेत आला. मंत्रिमंडळ विस्तार होऊन सरकारचं एक अधिवेशनही पार पाडलं. या अधिवेशनात सत्ताधारी आमदारांकडून आदित्य ठाकरेंना टार्गेट करणारं एक बॅनर आंदोलनात वापरण्यात आलं. या बॅनरवरील फोटो आणि त्यावरील मजकुरामुळे आदित्य ठाकरेंवर वैयक्तिक टीका केल्याची चर्चा सुरु आहे. मात्र आदित्य ठाकेरेंवर अशी व्यक्तिगत टीका करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता, असं आज भरत गोगावले यांना स्पष्ट करावं लागलं.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीच्या तीन दिवसात विरोधकांकडून शिंदे गटातील आमदारांवर पन्नास-खोके एकदम ओके.. अशी घोषणाबाजी करत आंदोलन कऱण्यात आलं. सत्ताधारी शिंदे गटानेही मग अधिवेशन संपण्याच्या आदल्या दिवशी विरोधकांच्या आधीच आंदोलन सुरु केलं. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंना टार्गेट करणारे बॅनर झळकावले. या बॅनरवर आदित्य ठाकरेंचा उल्लेख महाराष्ट्राचे परमपूज्य युवराज असा करण्यात आला. तसेच युवराज…2014 ला 151 चा हट्ट धरून युती बुडवली आणि 2019 ला खुर्चीसाठी हिंदुत्वावादी विचारधारा पायदळी तुटवली, अशा शब्दात आरोप करण्यात आला. एवढच नाही तर आदित्य ठाकरे ज्या वेगाने महाराष्ट्रभर दौरे करतायत, त्यावरही शिंदे गटाने टीका केली. पर्यटन खाते घेऊन घरातच बसून केला कहर… सत्ता गेल्यावर पर्यटनाची आली लहर.. खुर्चीत बसल्यावर शिवसैनिकाला केले तडीपार अन् सत्ता गेल्यावर फिरतात दारोदार.. जनता हे खोटे अश्रू आता पूसणार नाही, तुमच्या खोट्या रडगाण्याला भूलणार नाही, अशा घोषणा या बॅनरवर लिहिण्य्ता आल्या. तसेच युवराजांची ‘दिशा’ नेहमीच चुकली हे वाक्यही मोठ्या अक्षरात या बॅनरवर लिहिण्यात आले.
आदित्य ठाकरेंना आंदोलनातून टार्गेट करताना भरत गोगावले म्हणाले, ‘ दिशाचा अर्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर त्यांनी आघाडी करायला नको होती. भाजपसोबत युती करायचा हवी होती. दोन अडीच वर्ष पाहिलंत, आम्हाला कमी कमी करत चालले होते. म्हणून बाळासाहेबांची शिवसेना संपवण्याचं काम यांनी घेतलंय, असं आम्ही म्हणतोय. अजित पवार म्हणाले पुढच्या वेळेला मिशन १००… ते आमच्याच जोरावरती. उद्धव साहेबांना सांगायचे ५ वर्ष मुख्यमंत्री तुम्ही आणि इकडे खजिना घेऊन परस्पर विल्हेवाट लावत होते. म्हणून आम्ही दिशा चुकली म्हटलो… आम्ही त्यांच्या वैयक्तिक जीवनाबरोबर बोललो नाही. ते यंग ब्लड आहेत. अजून त्यांचं लग्न झालेलं नाही..
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटाणी हिच्यासोबत आदित्य ठाकरे यांचं नाव वारंवार जोडलं जातं. हे दोघंही चांगले मित्र आहेत. मात्र दोघांचे फोटो सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल झाले आहेत. दोघांच्या मैत्रीबद्दल अनेक प्रश्न वारंवार त्यांना विचारण्यात आले आहेत. मात्र दिशानेदेखील आदित्य माझा एक चांगला मित्र आहे, असे म्हटले आहे.