नवी दिल्ली : भाजपची भोपाळची उमेदवार प्रज्ञा ठाकूरने नथुराम गोडसेबाबत केलेल्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संताप व्यक्त केला आहे. “प्रज्ञा ठाकूरचं वक्तव्य घृणास्पद आहे. तिला मी मनापासून कधीही माफ करु शकत नाही”, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं. मोदी म्हणाले, “गांधीजी किंवा गोडसेबाबत जी काही वक्तव्य केली आहेत, ती अत्यंत चुकीची आहेत. घृणास्पद आहेत. अशी भाषा, विचार चालू शकत नाही. अशी वक्तव्ये करणाऱ्यांबाबत शंभर वेळा विचार करावा लागेल. त्यांनी माफी मागितली ती वेगळी गोष्ट आहे, मात्र मी माझ्या मनापासून त्यांना माफ करु शकत नाही”. न्यूज 24 या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदींना आपला संताप व्यक्त केला.
साध्वी प्रज्ञा सिंहने नथुराम गोडसेचा उल्लेख देशभक्त असा केला होता. त्याबाबत मोदींना विचारण्यात आलं. त्यावर मोदींनी साध्वी प्रज्ञाचं वक्तव्य अत्यंत घृणास्पद असल्याचं नमूद केलं. प्रज्ञाने माफी मागितली तरी माफी नाही. मी प्रज्ञाला मनाने माफ करणार नाही. प्रज्ञाचे वक्तव्य भयंकर होतं, असं मोदी म्हणाले.
भाजपकडून वाचाळवीरांची दखल, अखेर अमित शाह बोलले!
नथुराम गोडसेबाबत भाजप नेत्यांनी जी वक्तव्ये केली आहेत, ती त्यांची वैयक्तिक आहेत, त्याच्याशी पक्षाचं देणंघेणं नाही, असं ट्विट अमित शाह यांनी केलं. प्रज्ञा ठाकूर आणि नलीन कटील यांच्या वक्तव्याशी पक्षाचा संबंध नाही, असं अमित शाह म्हणाले. इतकंच नाही तर अमित शाहांनी या नेत्यांवर कारवाईचे संकेतही दिले. भाजपची अनुशासन समिती या तीनही नेत्यांकडून उत्तर मागेल, तसंच त्यांना दहा दिवसांच्या आत अहवाल देण्यास बजावलं आहे, असं अमित शाहांनी म्हटलं.
नथुराम गोडसे देशभक्त
भाजपची भोपाळची उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूरने महात्मा गांधींचा हत्यारा नथुराम गोडसे देशभक्त होता, आहे आणि राहील असं म्हटलं होतं. तिच्या या वक्तव्याने देशभरात संतापाची लाट उठली. त्यानंतर प्रज्ञा ठाकूरने माफी मागितली.
यानंतर केंद्रीय मंत्री अनंत हेगडेंनी ट्विट करत, प्रज्ञा ठाकूरचं वक्तव्य योग्य असल्याचं म्हटलं होतं. जवळपास 7 दशकांनी आज नवी पिढी या मुद्द्यावर चर्चा करत आहे. साध्वी प्रज्ञाने माफी मागण्याची गरज नाही, असं म्हटलं होतं.
संबंधित बातम्या
भाजपकडून वाचाळवीरांची दखल, अखेर अमित शाह बोलले!
साध्वी प्रज्ञा ठाकूरकडून नथुराम गोडसेचं समर्थन
Video: नथुराम गोडसे देशभक्त होते, आहेत आणि राहतील : प्रज्ञा ठाकूर