काँग्रेस नेते एचके पाटील काय म्हणतात त्यालाच आम्ही महत्त्व देतो; प्रफुल्ल पटेल यांचा नानांना टोला

| Updated on: Jul 16, 2021 | 11:15 AM

नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर मी कशाला बोलू, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं होतं. आता राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोलेंना टोले लगावले आहेत. (praful patel slams nana patole over contesting alone)

काँग्रेस नेते एचके पाटील काय म्हणतात त्यालाच आम्ही महत्त्व देतो; प्रफुल्ल पटेल यांचा नानांना टोला
praful patel
Follow us on

नागपूर: नाना पटोलेंसारख्या लहान माणसावर मी कशाला बोलू, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं होतं. आता राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नाना पटोलेंना टोले लगावले आहेत. आम्ही एचके पाटील काय म्हणतात त्याला महत्त्व देतो. कारण त्यांच्या बोलण्यात तथ्य असतं, अशा शब्दात प्रफुल्ल पटेल यांनी नानांना टोला लगावला आहे. (praful patel slams nana patole over contesting alone)

प्रफुल्ल पटेल यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा टोला लगावला. काँग्रेसकडून वारंवार स्वबळाची भाषा केली जात आहे. त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे?, असं पटेल यांना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी नानांना टोले लगावले. ज्यांना जे करायचं त्यांनी ते करावं. कुणीच कुणाला बांधून ठेवलं नाही. ही आघाडी आहे. ज्या पक्षाला जे करायचं त्यांनी ते करावं. त्यावर आम्ही रोज रोज उत्तरं का द्यावीत?, असा सवाल पटेल यांनी केला.

याचा अर्थ काय?

एचके पाटील हे काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. पाटील यांच्या बोलण्याला आम्ही महत्त्व देतो. त्यांच्या बोलण्यात तथ्य असतं. कारण ते थेट हायकमांडचे प्रतिनिधी म्हणून ते बोलतात, असा चिमटा त्यांनी नानांना काढला. एचके पाटील, बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे तिन्ही नेते शरद पवारांना भेटले. त्यानंतर हे तिन्ही नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. याचा अर्थ काय? इशारा तुम्हाला माहीतच आहे, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

बाकीचे काय बोलतात याला महत्त्व नाही

महाविकास आघाडीचे जनक शरद पवार आहेत. त्यांच्या नेतृत्त्वात सरकार आहे, त्यांच्याच नेतृत्त्वात सरकार चाललंय. महाविकास आघाडीला शरद पवारांचं मार्गदर्शन आहे. पुढेही राहीलच. बाकीचे लोक काय बोलतात याला महत्त्व नाही. नाना पटोले रोज बोलतात, त्याचं प्रतिउत्तर काय द्यावं? हे आम्हाला योग्य वाटत नाही, त्याचं सविस्तर उत्तर शरद पवार यांनी दिलंय. म्हणून त्यावर जास्त भाष्य करणं योग्य नाही. त्यावर रोज खुलासा करायचा हे आम्हाला योग्य वाटत नाही. एचके पाटील यांनी विधान केलं आहे. त्यामुळे नेमकं कुणाच्या बोलण्यावर जावं? कोण काय बोलतं त्यावर दररोज चर्चा करावी हे योग्य वाटत नाही, असंही ते म्हणाले.

आमदारांमध्ये नाराजी नाही

आघाडीत नाराजी असल्यामुळे स्वबळाचे नारे दिले जात आहेत का?, असा सवालही त्यांना करण्यात आला. त्याने काही फरक पडत असेल असे वाटत नाही. हा मीडिया इव्हेंट झाला आहे रोजचा, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये कोणतीही नाराजी नसल्याचंही स्पष्ट केलं.

एका व्यक्तीमुळे राजकारणाची दिशा ठरत नाही

राजनीतीकार प्रशांत किशोर यांनी आधी शरद पवार आणि नंतर काँग्रेस नेते राहुल गांधींची भेट घेतली. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. प्रशांत किशोर कन्स्टंट आहेत. त्यामुळे ते कुठेही जाऊ शकतात. ते कुणालाही भेटू शकतात. एका ठरावीक व्यक्तीमुळे राजकारणाची दिशा ठरत नसते, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

महामंडळाचा फॉर्म्युला ठरला

महाविकास आघाडी सरकारमध्ये महामंडळ आणि एनआयटी सदस्य नेमायचा फॉर्म्युला ठरला आहे. त्याप्रमाणे आमच्या जागा भरण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

महागाईवरून सरकारला धारेवर धरणार

दिल्लीतील पावसाळी अधिवेशनात महागाई, शेतकऱ्यांचा प्रश्न, कोरोना, चीनच्या सीमेवर काय चाललंय या मुद्द्यांवर चर्चा होणार, असल्याचंही त्यांनी सांगितलं. (praful patel slams nana patole over contesting alone)

 

संबंधित बातम्या:

राजेश टोपे कोल्हापुरात, अधिकाऱ्यांच्या आधीच कार्यालयात, नवे जिल्हाधिकारी धावतच बैठकीला हजर

…म्हणून नाना पटोले यांचे फोन चोरुन ऐकण्यात आले, संजय राऊतांनी सांगितलं कारण!

नाना रांगडे गडी, ते काय बोलतात आणि कसे डोलतात यावर सरकारचं भवितव्य अवलंबून नाही : संजय राऊत

(praful patel slams nana patole over contesting alone)