भोपाल : वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर (Pragya thakur) यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. “मी नाले, गटारं आणि शौचालये साफ करण्यासाठी खासदार बनलेली नाही असे वक्तव्य प्रज्ञा ठाकूर यांनी केले आहे.” याबाबतचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पंतप्रधान नरेंद्र यांच्या स्वच्छता अभियानाची अप्रत्यक्षपणे खिल्ली उडवली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आम्ही नाले किंवा शौचालये साफ करण्यासाठी खासदार झालेलो नाही हे सर्वांनी लक्षात ठेवा. ज्या कामांसाठी आम्ही खासदार झालो, ती कामं आम्ही प्रामाणिकपणे करु, असं साध्वी प्रज्ञा यांनी म्हटलं आहे.
मध्यप्रदेशातील सीहोर येथे आज एका सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सर्वसामान्य जनतेशी संवाद साधताना साध्वी प्रज्ञा यांनी हे वक्तव्य वादग्रस्त केलं. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. प्रज्ञा सिंह यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे त्या पुन्हा एकदा वादच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली आहे.
सत्तेत आल्यापासून भाजप सरकारने स्वच्छता अभियानाला फार महत्त्व दिले आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी स्वत: हातात झाडू घेऊन या अभियानातंर्गत रस्त्यावर साफसफाई करताना दिसतात. मात्र प्रज्ञा सिंह यांनी केलेल्या या वक्तव्याने त्यांनी स्वच्छता अभियानाला अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.
या आधी प्रज्ञा सिंह यांनी “नथुराम गोडसे देशभक्त होते, आहेत, आहेत आणि राहतील. जे त्यांना दहशतवादी म्हणत आहे. त्यांनी आधी स्वतःला तपासावे. या निवडणुकीत नथुराम यांना दहशतवादी म्हणणाऱ्यांना जनता उत्तर देईल.” असे वक्तव्य केले होते. त्यापूर्वी त्यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविरोधातही विधान केलं होतं. ठाकूर यांच्या या भूमिकांनंतर भाजपची अनेकदा कोंडी झाली आहे. त्यानंतर आता त्यांनी केलेल्या स्वच्छता अभियानाच्या वक्तव्यावर पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.