नागपूर : राज्यात तीन पक्षांचं महाविकास आघाडी सरकार आणि एकूणच महाराष्ट्रातील राजकीय स्थिती पाहता शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचा ‘प्रहार’ पक्ष इलेक्शन मोडवर आलाय. प्रहारला पहिल्यांदाच मंत्रीपद मिळालंय. त्यामुळे या मंत्रिपदाचा फायदा पक्ष संघटनेसाठी करुन घेत ‘प्रहार’ची राज्यभर वेगानं सदस्य नोंदणी सुरु झालीय. शिवाय बच्चू कडू यांच्यासह पक्षातील प्रमुख नेते ठिकठिकाणी शाखा गठित करत आहेत. विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणूकीत ‘प्रहार’चं मिशन 12 ते 15 आमदार असल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलंय. यासाठी त्यांनी खास रणनीती देखील आखलीय.
शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले, “प्रहार संघटनेच्या वाढीसोबत लोकांचं समाधान होईल, असा आम्हाला विश्वास आहे. म्हणूनच 9 ऑगस्टला क्रांती दिनाच्या दिवशी आपण राज्यभर प्रहार संघटनेची सदस्य नोंदणी सुरू केलीय. एका वेगळ्या विचाराने प्रहार संपूर्ण महाराष्ट्रात काम करेल. प्रचंड प्रमाणात लोक संघटनेत सहभागी होत आहेत. आगामी काळात आम्हाला राजकीय अस्तित्व अधिक ताकदीने निर्माण करायचं आहे.”
“आगामी निवडणुकीत प्रहारचे 15-20 आमदार विधानसभेत नेल्याशिवाय आम्ही राहणार नाही. केवळ आमदारकीसाठी नाही, तर जनसामान्यांचा आवाज म्हणून हे करु. प्रहार आहे म्हणून आपण अपंगांचे 32 शासननिर्णय आपण काढू शकलो. आताचं 1 टक्का आरक्षण देखील याचाच परिणाम आहे. येणाऱ्या काळात भिक मागणाऱ्यांची आम्ही कार्यशाळा घेणार आहोत. शेतकऱ्यापासून या घटकांपर्यंतच्या कामाचा प्रभाव वाढवायचा असेल तर प्रहार संघटनेचा प्रभाव वाढणं महत्त्वाचं आहे. म्हणून आम्ही यात जास्त लक्ष देतोय,” असं बच्चू कडू यांनी सांगितलं.
“सदस्य नोंदणीतच निवडणुकीची तयारी आहे. याच माध्यमातून आम्ही प्रत्येक मतदारसंघात पोहचू. संपूर्ण महाराष्ट्रात नोंदणी होईल. त्यानंतर 10-15 मतदारसंघ आमचं टार्गेट असेल. या मतदारसंघांमध्ये आम्ही मोठ्या ताकदीने प्रयत्न करु,” असंही त्यांनी नमूद केलं. आगामी निवडणूक शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस की भाजपसोबत लढणार असा प्रश्न विचारला असता बच्चू कडू यांनी आम्ही लोकांसोबत निवडणूक लढू असं उत्तर दिलं. पक्षापेक्षा आम्ही लोकांचे प्रश्न घेऊन लढू असंही त्यांनी नमूद केलं.
Prahar Chief Bachchu Kadu say will win 12-15 seats in Assembly election