मुंबई : निवडणूक आल्यानंतर विद्यमान लोकप्रतिनिधीने त्याच्या कार्यकाळात किती काम केलं हा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा असतो. मुंबईतील आमदारांचं रिपोर्ट कार्ड प्रजा फाऊंडेशनने (Praja Foundation Report card) समोर मांडलंय. मुंबईतल्या आमदारांची संख्या लक्षात घेतली तर शिवसेना आणि भाजपचेच 36 पैकी 25 आमदार आहेत. मात्र कामगिरीच्या बाबतीत काँग्रेसच्या आमदारांनी बाजी मारली आहे. प्रजा फाऊंडेशन (Praja Foundation Report card) या संस्थेने तयार केलेल्या अहवालात पहिल्या तीनमध्ये भाजपचा एकही आमदार नाही.
मुंबईतील आमदारांचा लेखाजोखा
प्रजा फाऊंडेशन या संस्थेने सर्वपक्षीय आमदारांचा लेखाजोखा सादर केलाय. 2014 ते 2019 या कार्यकाळात सर्वोत्तम कामगिरीमध्ये काँग्रेसचे आमदार अव्वल आहेत.
पहिल्या क्रमांकावर काँग्रेसचे अमिन पटेल आहेत. त्यांना 79.58 % गुण आहेत. तर दुसऱ्या क्रमाकांवर शिवसेनेचे सुनिल प्रभू असून त्यांना 76.87% गुण आहेत. काँग्रेसचे असलम शेख 75.12% गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
2019 या वर्षातील कामगिरीत शिवसेनेचे आमदार पहिल्या क्रमांकावर आहेत. वार्षिक कामगिरीच्या बाबतीत पहिल्या तीन आमदारांमध्ये शिवसेनेचे सुनिल शिंदे पहिल्या क्रमांकावर आहेत. शिंदेंना 79.38 % गुण देण्यात आले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस आमदार अमिन पटेल असून त्यांना 79.20 % गुण आहेत, तर तिसऱ्या क्रमांकावरही काँग्रेसचे असलम शेख आहेत, त्यांना 78.29 % गुण देण्यात आलेत.
पक्षनिहाय कामगिरी
पक्षनिहाय आमदारांचा विचार केला तर त्यातही काँग्रेसच्या आमदारांचीच कामगिरी चांगली असल्याचं प्रजा फाऊंडेशनचं म्हणणं आहे.
पहिल्या क्रमांकावर काँग्रेस असून काँग्रेसच्या 5 आमदारांना 75 % गुण आहेत. दुसऱ्या क्रमांकावर भाजप असून भाजपच्या 12 आमदारांना 65% गुण, तर तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना असून 13 आमदारांना 60 % गुण देण्यात आले आहेत.
दरम्यान भ्रष्टाचाराचं प्रमाण घटल्याचंही या अहवालातून निदर्शनास आलंय. भ्रष्टाचाराचं प्रमाण 38 टक्क्यांवरुन 14 टक्क्यांवर आलंय. मुंबईतील 36 आमदारांपैकी 13 आमदारांवर गुन्ह्याची नोंद नाही. प्रजा फाऊंडेशनने अभ्यासपूर्वक माहिती गोळा करुन आकडेवारी सादर केली आहे. मात्र खरं प्रमाणपत्र तर येत्या दोन महिन्यात मतदारच देणार आहेत.