एक दिवस नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचाही होईल… प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

| Updated on: Jan 23, 2023 | 2:19 PM

नातेवाईकांचं राजकारण वाढत गेलं, तसं दिशांचं, गरीबांचं राजकारण बाजूला पडत गेलं. भांडवलशाही, लुटारूंच्या सत्तेला सुरुवात झाली. नव्या गोष्टी मांडण्याची गरज आहे, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं.

एक दिवस नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचाही होईल... प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल
Image Credit source: social media
Follow us on

मुंबईः राजकारणात (Politics) कुणीही अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. आमच्या नेतृत्वाचा अंत होणार तसा एक दिवस नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याही नेतृत्वाचा अंत होणार आहे. पण भाजपा सध्या देशातील लीडरशिप संपवण्याच्या मार्गावर आहे. लोकशाहीसाठी अत्यंत घातक अशी ही वृत्ती आहे. या वृत्तीला विरोध करण्यासाठी, लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली आहे, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं. शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची अधिकृत घोषणा आज झाली.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज यासंदर्भाने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी भाजपच्या रणनीतीवर हल्लाबोल केला.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘ जिंकून येणं हे मतदारांच्या हातात आहे पण उमेदवारांचं सामाजिकरण, सार्वत्रिकरण होण्याची अपेक्षा आहे. १६९ कुटुंबात होती. आता १० कुटुंबांची वाढ झाली आहे. नातेवाईकांचं राजकारण वाढत गेलं, तसं दिशांचं, गरीबांचं राजकारण बाजूला पडत गेलं. भांडवलशाही, लुटारूंच्या सत्तेला सुरुवात झाली. नव्या गोष्टी मांडण्याची गरज आहे…

अर्थव्यवस्थेत मोठ्या इंडस्ट्रीची गरज होती. आज शेतीला जोडधंदा असावा, शेतीची प्रक्रिया करणारे उद्योग यावर चर्चा होत नाही.
दावोसला जाऊन मोठमोठे करारनामे होतात. पण शेतीवर पिकणारी यंत्रणा निर्माण झाली तर महाराष्ट्राला नवी दिशा मिळेल…

नरेंद्र मोदींचं नेतृत्वही संपणार…

देशातील लीडरशिप संपुष्टात आणली जात आहे, यावर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, ‘ पॉलिटिकल लीडरशिप संपत चालली आहे. ईडीच्या मार्फत या देशातलं पॉलिटिकल लीडरशिप संपवण्याचं काम सुरु आहे. त्यांनी खरंच भ्रष्टाचार केला असेल तर केस करा, खटले दाखल करा आणि जेलमध्ये टाका. पण ते न करता लीडरशिपवर आक्षेप घेतला जातोय. हे आजच्या घडीला मोठं धोकादायक आहे…

आपण कुणीही अमरपट्टा घेऊन आलेलो नाहीत. एक दिवस आपलाही अंत होणार आहे. तसा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचाही अंत होणार आहे. त्यांनी त्यांच्या पक्षातलीही लीडरशिप संपवली आहे. त्यांचे अनेक मंत्री सांगतात. आम्ही फक्त फायली उचलून घेतो..

क्राइसिसमध्ये राजकीय नेतृत्व विकसित होत असतं. आजच्या संकटात कुठेही राष्ट्रीय नेता दिसत नाही. ते नेतृत्व विकसित करण्यासाठी आम्ही संयुक्त प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्र तसेच राज्याबाहेरच्या पक्षांनाही आमची मदत आणि पाठिंबा राहील, असं आश्वासन प्रकाश आंबेडकर यांनी दिलं.