नवी दिल्ली : आगामी विधानसभेसाठी शिवसेना आणि भाजप हे जोरदार तयारीला लागले आहेत. त्यानंतर आता विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही हालचाल करण्यास सुरुवात केली आहे. नुकतंच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (29 जून) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीला 25 जागा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीची जबाबदारी काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील आणि माणिकराव ठाकरे यांच्यावर सोपवण्यात आल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी नवी दिल्लीत बैठक बोलवली होती. या बैठकीत मल्लिकार्जून खर्गे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांसारख्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी हजेरी लावली.
येत्या विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसकडे 50 पेक्षा जास्त जागा मागितल्या होत्या. मात्र या बैठकीत काँग्रेसकडून वंचितला केवळ 25 ते 30 जागा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीत पराभव का झाला याबाबत चर्चा करण्यात आली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. तसेच राजकीयदृष्ट्या काँग्रेस पक्षाला विजय कसा मिळेल यावर चर्चा करण्यात आली. त्याशिवाय या बैठकीत राष्ट्रवादीसोबत समन्वय साधून विधानसभा निवडणूक लढण्याची रणनीती काँग्रेसने तयार केली आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीची जबाबदारी काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील आणि माणिकराव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी राहुल गांधी यांनी महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे सोपवली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस प्रकाश आंबेडकरांशीही चर्चा करणार आहे. तसेच राष्ट्रवादीसोबतही निवडणूक लढण्याची रणनीती काँग्रेसने तयार केली आहे. दरम्यान याबाबत महाराष्ट्रातील अध्यक्ष बदल बाबत कुठलीही चर्चा झाली नाही, अशी माहिती काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांनी दिली.
याबाबत चर्चा करण्यासाठी येत्या 3 जुलैला माणिकराव ठाकरे आणि हर्षवर्धन पाटील यांचे शिष्टमंडळ प्रकाश आंबेडकरांशी यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यामुळे या बैठकीत काय निर्णय होतो हे पाहणे विधानसभेच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
अशोक चव्हाणांचा राजीनामा मंजूर होणार, महाराष्ट्रात ओबीसी चेहऱ्याला संधी?