मुंबई: भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे आघाडीसाठी 12 जागांची मागणी केली आहे. भाजपविरोधात एकत्र येण्याचा आमचा प्रयत्न आहे. आघाडीच्या नेत्यांच्या प्रस्तावावर वंचित विकास आघाडी चर्चा करेल. त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृह या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. काँग्रेसकडून अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे तर राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ आणि समीर भुजबळ या बैठकीला उपस्थित होते. याच बैठकीत प्रकाश आंबेडकर यांनी 12 जागांची मागणी केली. या 12 जागांमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.
“आम्ही 12 जागांच्या मागणीवर ठाम आहोत. त्यापेक्षा कमी जागा आम्ही घेणार नाही. एमआयएमशी युतीबाबत कारण नाही. कारण एमआयएम आता जागा लढणार नाही”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
काँग्रेसचा नकार
प्रकाश आंबेडकरांनी 48 पैकी तब्बल 12 जागांची मागणी केल्याने, काँग्रेसने त्यावर आक्षेप घेत नकार दिला आहे. याशिवाय सोलापूर लोकसभेची जागा देण्यास काँग्रेसचा विरोध आहे. आंबेडकरांना लोकसभेच्या जास्त जागा देण्यास काँग्रेस तयार नाही. आंबेडकर यांनीच आता निरोप द्यावा, अशी भूमिका काँग्रेसने जाहीर केली.
छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया
आंबेडकरांशी चर्चा सुरु आहे, आम्ही आशावादी आहोत. त्यांनी लेखी प्रस्ताव मागितला तो त्यांना दिला. अजूनही आमची चर्चा सुरु आहे. चर्चेतून मार्ग निघेल , अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.