मुंबई | 20 डिसेंबर 2023 : देशातील सुमारे 28 लहान मोठे राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष मिळून इंडिया आघाडी (INDIA AGHADI) तयार झाली आहे. इंडिया आघाडीची चौथी बैठक काल नवी दिल्ली येथे झाली. या बैठकीत अनेक मुद्द्यांना हात घालण्यात आला. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांची महाविकास आघाडी आहे. परंतु, शिवसेनेसोबत असलेल्या वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत आणि इंडिया आघाडीमध्ये घेण्यात आलेले नाही. त्यामुळे काल झालेल्या बैठकीत इंडिया आघाडी सोबत वंचित बहुजन आघाडीला घेण्याबाबत अनेक नेत्यांनी अनुकूलत दर्शविली अशी माहिती सूत्रांनी दिली होती. त्यानंतर एक मोठी बातमी समोर आली आहे. वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना एक मेसेज आला आहे ही माहिती आंबेडकर यांनीच दिली आहे.
मुंबई येथे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी काही जण भारत जोडो यात्रा काढतात. काही जण मुस्लिमांच्या बाजूने बोलतात. पण, यात कोणाला ना कोणाला वगळले जाते. आदिवासी असो, दलित असो किंवा मुस्लिम असो जातीजातीत विभक्तपणा कसे येईल असेच काम केले जाते. एकमेकांबद्दल द्वेष निर्माण केला जातोय. त्यादृष्टीने एकमेकांवर विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. यासाठी नागपूरला जाहीर मुक्तिदिन साजरा करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली.
मराठा आरक्षणासाठी सरकार विशेष अधिवेशन घेणार आहे. मी मागे तेच म्हटले होते की शासनाने जर खरे सांगितले तर लोक ऐकतील. पण, खोटे बोलले तर त्याचा उद्रेक होईल. जातीजातीमध्ये संघर्ष लावण्याचा प्रकार सुरु आहे. त्यामुळे विश्वास कमी होत चालला आहे. हा विश्वास जर तुटत गेला तर पुढे काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
संसदेची सुरक्षा ही लोकसभेचे स्पीकर बघतात. वॉच स्टाफ हा लोकसभेच्या स्पीकर सोबत होता. १९९६ मध्ये वॉच स्टाफ कमी केला आणि दिल्ली पोलीस यांच्या अंडर आला. दिल्ली पोलीस हे गृहमंत्र्यांच्या हातात आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची माहिती गृहमंत्री आणि पंतप्रधान यांनी द्यावी. संसदेत खासदारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. आधी उपराष्ट्रपती यांनी स्वतःची जबाबदारी पाळावी. स्वतःची जबाबदारी तुम्ही टाळली. आंदोलनकर्त्यांचे निलंबन केले. तुमची मिमिक्री केली गेली कारण तुम्ही संविधानिक पद्धतीने काम केले नाही म्हणून हे झाले असे त्यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपच्या ३० जागा येऊ द्यायच्या नाही. विभक्त लढा लढला तर कोणा एकाच्या पारड्यात मत जात नाही. त्यामुळे आघाडी महत्वाची आहे ते माझे मत आहे. महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी सोबत जायचे की नाही याचा विचार करत आहोत. इंडिया आघाडीत आमचे वकील शिवसेना आहे ते स्ट्रॉंग आहेत. ते आमची बाजू मांडत आहे. तिथून कालच मेसेज आला आहे की आपल्याला बसून बोलायला लागेल. त्यानुसार आम्ही प्रस्ताव तयार करत आहोत असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले.