प्रकाश आंबेडकर यांचा संयम सुटला, थेट महाविकास आघाडीलाच गंभीर इशारा; राजकीय वर्तुळात खळबळ

| Updated on: Jan 20, 2024 | 8:52 PM

आघाडी झाली असती तर लोकांच्या प्रश्नांवर चर्चा सुरु झाली असती. आम्ही म्हणतो आघाडी झाली पाहिजे. तुरुंगात जाण्याच्या भीतीने आघाडी झाली नाही तर वंचितच्या पाठीशी उभे राहा. काँग्रेसवाले आम्हाला सल्ला देतात प्रकाश आंबेडकर यांना सगळे ओळखतात. बिन बुलाये आम्ही कुठेच जणार नाही, कारण आमची बाजू कमजोर नाही. आम्ही तुम्हाला वाचवायला बसलो आहे. पण तुमचा मोदींवर विश्वास असेल तर आम्ही काय करू? मोदी हे मदारी आहेत ते डमरू वाजवतात आणि इथले पक्ष नाचतात, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.

प्रकाश आंबेडकर यांचा संयम सुटला, थेट महाविकास आघाडीलाच गंभीर इशारा; राजकीय वर्तुळात खळबळ
prakash ambedkar
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

अमरावती | 20 जानेवारी 2024 : महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत आमचा समावेश करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर वारंवार करत आहेत. मात्र, त्यांचा अद्यापही महाविकास आघाडीत समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर अस्वस्थ असल्याची चर्चा आहे. आज तर प्रकाश आंबेडकर यांचा संयमच सुटला आहे. त्यांनी थेट आघाडीलाच निर्वाणीचा इशारा दिला आहे. आम्हाला महाविकास आघाडीत घ्या, नाही तर निवडणुकीत तुम्हालाही गाडू, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या इशाऱ्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

प्रकाश आंबेडकर यांची अमरावतीत सभा होती. यावेळी त्यांनी हा गंभीर इशारा दिला. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन दोन वर्षे झाले पण यांच्यात अजूनही समझोता झालेला नाही. जागा वाटप झालं नाही. त्यामुळे मला संशय वाटत आहे. यांना खरंच भाजप आणि मोदींना हरवायच आहे का? हा माझा सवाल आहे. आम्हाला म्हणतात दोन जागा घ्या. यांना काय आम्हाला बळीचा बकरा करायचे आहे काय? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला.

तर तुम्हालाही गाडू

तुम्ही आम्हाला चर्चेत घेतलं तर आम्ही तुमच्या सोबत येऊ. पण तुम्ही आम्हाला विचारतच नसाल आणि इथल्या गरीब मराठ्यांसारखा वापर करत असाल तर ते जमणारं नाही. तसं करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर आम्ही भाजपबरोबर तुम्हालाही गाडू, असा इशाराच आंबेडकर यांनी दिला.

तरच वाचाल

तुम्ही आधी तुमच्या जागा वाटून घ्या. वाटाघाती झाली नाही तर आम्ही आमच्या 48 च्या 48 जागा लढवणार आहोत. आमची तयारी झालेली आहे. आम्ही फक्त तुमच्या निर्णयाची वाट पाहत आहोत. वंचितमधील कोणीही तुरुंगात जाणार नाही. गेले तर सोनिया गांधींपासून सगळे जेलमध्ये जातील. पण प्रश्न हा आहे की, तुम्हाला लढण्याची इच्छा आहे का? मोदींना हरवण्याची इच्छा आहे का? तुमच्या मानगुटीवर तलवार आहे. एकत्र लढले तर तलवार हटवली जाईल. आघाडी केली तर वाचाल. नाही केली तर जेलमध्ये जाल. भाजपचा कार्यक्रम हुकूमशाही पद्धतीने चालू आहे, मोदींना केवळ एकच पक्ष पाहिजे. त्यामुळेच राजकीय पक्ष वाचणं ही काळाजी गरज आहे. राष्ट्रवादी,काँग्रेस, आणि ठाकरे यांनी बसून समझौता करावा अन्यथा जेलमध्ये जावं लागेल, असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला.

हा डोंबाऱ्याचा खेळ

ही आरपारची लढाई आहे. ते जिंकले तर आपण गुलाम होऊ. काँग्रेसने भारत जोडो यात्रा कार्यक्रम सुरू केला आहे. ही यात्रा केव्हा संपणार आहे? मोदी यांना खिंडीत अडकवणार आहात की नाही? काँग्रेस यात्रेला निघाली असताना इकडे निवडणूक पार पडेल. निवडणूक तोंडावर आली आहे. उद्या निवडणूकला तोंड द्यायचं आहे. निवडणूकीला तोंड देण्याएवजी हे भारत जोडो यात्रा काढत आहेत. याला मी डोंबाऱ्याचा खेळ म्हणतो, अशी टीकाच त्यांनी केली.