मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज ‘मातोश्री’वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Prakash Ambedkar CM Uddhav Thackeray Matoshree meet) यांची भेट घेतली. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायदा अर्थात एनआरसीविरोधात वंचित बहुजन आघाडीतर्फे 26 डिसेंबरला धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्या आंदोलनाची माहिती घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण दिलं होतं. (Prakash Ambedkar CM Uddhav Thackeray Matoshree meet)
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी माध्यमांना माहिती दिली. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “मुख्यमंत्र्यांचा निरोप आल्याने भेटायला आलो. 26 तारखेला धरणे आंदोलन होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी शांततेचं आवाहन केलं. आमची आंदोलने शांततेतच होतात असं सांगितलं”
भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेबाबत माझ्याकडे असलेली माहिती मुख्यमंत्र्यांनी मागितली आहे. पुढच्या बैठकीत मी त्यांना माझ्याकडे असलेली माहिती देणार आहे, असं आंबेडकर म्हणाले.
“नागरिकत्व कायदा केवळ मुस्लिमांनाच लागू होतो हा भाजप-संघाचा प्रचार खोटा आहे. या कायद्यामुळे 40 टक्के हिंदूही भरडले जाणार आहेत. शिवाय अन्य जातींनाही याचा फटका बसणार आहे, त्यामुळेच हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे”, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.
“या कायद्यामुळे मुस्लिम भरडला जाणार आहेच, शिवाय हिंदूमधील 40 टक्के जनता भरडणार आहे. भटके विमुक्त 9-12 टक्के, आलुतेदार-बलुतेदार त्या सगळ्यांकडे कागदपत्रं नाहीत. एनआरसी लागू होईल तेव्हा जन्म कधी झाला याची नोंद नाही. त्यामुळे अशा लोकांना फटका बसेल” असं आंबेडकर म्हणाले.
आमचा मोर्चा नाही, तर धरणं आंदोलन आहे. दादरम्ध्ये 26 तारखेला हे धरणं आंदोलन होईल. डिटेन्शन कॅम्प आहेत, त्याबाबत एक समिती बनवून सविस्तर माहिती द्या, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं आंबेडकर म्हणाले.