अभिजीत पोते, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 8 जानेवारी 2024 : आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निर्णय यायला अवघे 48 तास उरले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय निर्णय देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. नार्वेकर यांच्या या निर्णयाआधीच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. ठाकरे गटाला धक्का बसेल असं हे आंबेडकर यांचं विधान आहे. त्यामुळे आता ठाकरे गट काय प्रतिक्रिया देतो आणि नार्वेकर हे आंबेडकर यांचा सल्ला मानणार का? असा सवाल केला जात आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर विचारण्यात आलं. यावेळी त्यांनी माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चॅटर्जी यांच्या बाबत घडलेला एक प्रसंग सांगून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मोठा सल्ला दिला आहे. राहुल नार्वेकरने सुप्रीम कोर्टाला डिफाय केलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे मी निर्णय नाही देत. काय करायचं ते करा, असा सल्लाच प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिला आहे.
विधानसभा अध्यक्ष हे सुप्रीम कोर्टाच्या अखत्यारीत येत नाहीत. तेव्हा नार्वेकरांनी सरळ कोर्टाला सांगावं निर्णय देत नाही. काय करायचं ते करा. कायद्याचं राज्य चाललं पाहिजे हे बरोबर आहे, असं ते म्हणाले. तसेच राहुल नार्वेकर निर्णय देत नाही हे अत्यंत चुकीचं आहे हे मी मानतो. पण राहुल नार्वेकर स्पीकर म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत येत नाहीत. सुप्रीम कोर्ट स्पीकरला ताब्यात घेऊ पाहत आहे. या निमित्ताने स्पीकर म्हणून नार्वेकर यांनी सांगितलं पाहिजे निर्णय देणार नाही. मला जेव्हा निर्णय द्यायचा तेव्हा देईल, असंही आंबेडकर म्हणाले.
स्पीकरला सामान्य माणूस करण्याचा सुप्रीम कोर्टाचा मार्ग संवैधानिक नाही. स्पीकर हा कोर्टाच्या अंडर येऊ शकत नाही. सोमनाथ चॅटर्जी लोकसभेचे अध्यक्ष असताना त्यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवली होती. तेव्हा चॅटर्जी यांनी उलटा जवाब दिला होता, नोटीस पाठवणाऱ्यांना मी समन्स करतो. मला नोटीस बजावणारा लोकसभेत येत कसा नाही ते मी बघतो, असा इशाराच चॅटर्जी यांनी दिला होता. तेव्हा कुठे जाऊन लोकसभा अध्यक्ष विरुद्ध कोर्टाचं भांडण मिटलं. तेव्हा कोर्टाने चूक मान्य केली होती. स्पीकरला आम्ही नोटीस पाठवू शकत नाही, असं कोर्टाने कबूल केलं होतं. नार्वेकर राज्याचे स्पीकर आहेत. सोमनाथ चॅटर्जी लोकसभेचे स्पीकर होते. पण दोघांचे अधिकार समान आहेत, असं सांगतानाच राहुल नार्वेकर यांना म्हणणे तुम्हाला सोमनाथ चॅटर्जी व्हायची संधी मिळाली आहे. होऊन जा…, असं आंबेडकर म्हणाले. आंबेडकर यांचा हा सल्ला नार्वेकरांनी मानल्यास त्याचा सर्वाधिक फटका ठाकरे गटाला बसण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.