सागर सुरवसे, लातूरः शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत संजय राऊत यांनी दिलेला सल्ला तुम्ही मानणार का, असा सवाल प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना विचारण्यात आला. वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी यावर खोचक उत्तर दिलंय. मला हा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला असता तर तो मी मानला असता, असं वक्तव्य आंबेडकर यांनी केलंय. त्यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, यावरून राजकीय चर्चा सुरु आहेत. शरद पवार हे भाजपाचेच आहेत, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं. त्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रकाश आंबेडकरांना फटकारण्याची भाषा केली होती. प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांबाबत सांभाळून बोलण्याचा सल्ला त्यांनी दिला होता.
शरद पवार हे भाजपचेच आहेत, असं म्हणणं हा त्यांचा कारकीर्दीवरील मोठा आरोप आहे. ते भाजपचे असते तर महाराष्ट्रात त्यांनी अडीच वर्षांपूर्वी आलेलं भाजपचं सरकार दूर ठेवून महाविकास आघाडी सरकार येऊ दिलं नसतं. विरोधी पक्षाच्या एकीचा विचार येतो तेव्हा शरद पवारच एकत्र आणण्याचं काम कतात. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी शब्द जपून वापरले पाजिते, असा सल्ला संजय राऊत यांनी दिलाय.
महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा शब्द मानला जातो. त्यांचं नेतृत्व मानलं जातं. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची आता ठाकरेंच्या शिवसेनेशी युती झाली आहे. महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांची समजूत घालून वंचितला महाविकास आघाडीत घेण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न आहे. असे झाल्यास प्रकाश आंबेडकर शरद पवार यांचं नेतृत्व मान्य करणार का, असा सवाल विचारला जातोय. यावरून प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीत आम्ही शामिल जालो तर हे जॉइंट नेतृत्व असेल. तिथे कुणा एकाचं नेतृत्व नसेल.
शरद पवार हे भाजपचेच आहेत, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी दोन दिवसांपूर्वी केलं, त्यावर त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं. मी जुना इतिहास सांगताना ते वक्तव्य केलं होतं. आताचे संदर्भ वेगळे आहेत. कुणी त्याचा आताच्या संदर्भाने अर्थ लावला असेल तर मी काही करू शकत नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
महाविकास आघाडीतील मतभेदांपुढे भाजपाला कमी लेखू नका, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. भाजप कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही थराला जाईल. भांडणं लावणं, मतभेद वाढवण्यासाठी काहीही करू शकते.सरळ जिंकता आलं नाही तर ते भांडणं लावून देतात. लोकशाही वाचवायची असेल तर सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
युतीचा आणि निवडणुकांचा काहीही संबंध नाही. ज्यांना मदत करावी वाटते, त्यांनी एकमेकांना मदत करावी. महाविकास आघाडीतील इतर घटकपक्षांना समजावून सांगण्याचा उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत. वंचितला बरोबर घेण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.