जळगाव | 18 डिसेंबर 2023 : मराठा समाजाला टिकाऊ आणि सरसकट आरक्षण देऊ, असं आश्वासन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलं आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण गिरीश महाजन यांच्या या आश्वासनावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी संशय व्यक्त केला आहे. गिरीश महाजन यांनी माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर द्यावं. त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तरच राज्य सरकार मराठा समाजाला टिकणारं आणि सरसकट आरक्षण देईल, असं म्हणता येईल, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. प्रकाश आंबेडकर हे मीडियाशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी महाजन यांना एक सवाल केला आहे.
महाराष्ट्राचे ॲडव्होकेट जनरल कुंभकोणी यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबई उच्च न्यायालयात यशस्वी किल्ला लढवला होता. त्या कुंभकोणी यांना मराठा आरक्षणाच्या केसमध्ये नियमित का केलं नाही? लक्ष देऊ नका, हजर राहू नका असं त्यांना का सांगण्यात आलं? याचं उत्तर गिरीश महाजन यांनी द्यावं. महाजन यांनी उत्तर दिल्यास ते टिकणारं आणि सरसकट आरक्षण मराठा समाजाला देतील, असं मानता येईल, असा चिमटा प्रकाश आंबेडकर यांनी काढला.
जरांगे पाटील यांच्या प्रश्नावर आणि लढ्यावर माझ्याकडे सोल्युशन आहे. मात्र हे सोल्युशन या चोरांसमोर मांडलं तर ते त्याचं खोबरं करून टाकतील, असं खळबळजनक वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यायचं कसं हे मी नवीन सरकार, नवीन सत्ताधाऱ्यांना सांगेल. आताच्या सत्ताधाऱ्यांना सांगणार नाही, असं सांगतानाच सरकारचं आणि जरांगे पाटील यांचं आरक्षणावरून जे भांडण सुरू आहे. ते असंच चाललं पाहिजे. कारण जरांगे पाटील यांच्या सरकारसोबतच्या लढ्यामुळे लोकांमध्ये जागृती येत आहे, असं विधान त्यांनी केलं.
आंबेडकर यांनी हिवाळी अधिवेशनावरही टीका केली. नागपूरमध्ये सुरू असलेलं हिवाळी अधिवेशन म्हणजे लोकशाहीतील तामाशा आहे. अधिवेशन सुरू आहे असं वाटतच नाही. सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण हेच कळत नाही. अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होताना दिसत नाही. जे सत्ताधाऱ्यांनी मांडायला पाहिजे ते विरोधक मांडत आहेत आणि जे विरोधकांनी मांडलं पाहिजे ते सत्ताधारी मांडत आहेत. त्यामुळे मी याला लोकशाहीचा तमाशा असं म्हणतो, अशी टीका त्यांनी केली.
प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. नरेंद्र मोदी हे देशाला प्रचंड मोठा धोका आहेत. ज्या आरएसएसच्या जोरावर नरेंद्र मोदी मुख्यमंत्री आणि त्यानंतर पंतप्रधान झाले. त्याच आरएसएसचे तीन तेरा वाजवायचं नरेंद्र मोदी यांनी ठरवल्याचं दिसतंय, असं सांगतानाच नरेंद्र मोदी यांच्याशी वर्षभरात किती वेळा भेट झाली हे मोहन भागवत यांनी जाहीर करावं. आणि कुठे झाली हे सुद्धा जाहीर करावं म्हणजे लोकांना विश्वास वाटेल. मी विचारलेल्या प्रश्नाचं मोहन भागवत यांनी उत्तर दिलं नाही. त्यामुळे मोदींसोबत त्यांची वर्षभरात भेट झाली नाही असंच यावरून सिद्ध होतं, असं आंबेडकर म्हणाले.