मनसे नेते प्रकाश महाजन यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत खोचक टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांनी शंकराचार्यांची पाद्यपूजा करण्याऐवजी राज ठाकरे यांची पाद्यपूजा केली पाहिजे. कारण राज ठाकरे हे विज्ञानवादी नेते आहेत, असं सांगतानाच आचार्य अत्रे असते तर गेल्या दहा हजार वर्षात असा हिंदू नेता जन्मला नाही, असं राज ठाकरेंबद्दल म्हणाले, असते. प्रबोधनकार ठाकरे असते तर त्यांना आपल्या नातवाबद्दल अभिमान वाटला असता, असा टोला प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
प्रकाश महाजन यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला आहे. मनसेच्या मेळाव्यात काल राज ठाकरे यांचं भाषण झालं. हे भाषण प्रकाश महाजन यांना बघता आलं नाही. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. दुर्देवाने मी प्रत्यक्षपणे भाषण ऐकू शकलो नाही. नंतर मी भाषण पाहिलं. ते भाषण ऐकून मला अधिकच उत्साह आला. आता तिसऱ्या पर्यायाच्या दृष्टीने राज ठाकरे निघाले आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीनंतर आता तिसरा पर्याय राज्यातील जनतेला हवा आहे, असं प्रकाश महाजन म्हणाले.
राज ठाकरे यांनी जो महाराष्ट्र बघितला तो अजून अस्तित्वात यायचा आहे. त्यांनी त्यात पर्यावरणाचा विचार केला आहे, येणाऱ्या दिवसाच्या विचार केला आहे आणि प्रगतशील राष्ट्रचा देखील विचार केला आहे. खरं म्हणजे हिंदूंना विज्ञानाचा दृष्टिकोन ठेवून हिंदुत्व शिकवणारा नेता मिळाला आहे. गेल्या 50 वर्षात असा विचार कोणीच मांडला नाही. राज ठाकरे यांचे हिंदुत्व जुन्या रूढी परंपरा घेऊन चालणारं नाही, नव्या विचारांना वाव देणारं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
महाराष्ट्रा विषयी त्यांच्या काही कल्पना आहेत. त्यांना एक संधी मिळायला पाहिजे. त्यामुळेच आम्ही ठरवलं की एक प्रयत्न करू. विज्ञानवादी हिंदुत्वावर आज राज ठाकरे हेच खरे ठरले आहेत. राज ठाकरे जरी आज जन्माला आले असले तरी ते 100 वर्षे पुढचा विचार करतात. यावेळी महाराष्ट्राचे प्रश्न मांडून आम्ही जनतेकडे मत मागू. राज ठाकरे कमकुवत नाहीत. त्यांच्या सारखा हुकमी एक्का आमच्याकडे आहे, असंही ते म्हणाले.