मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना पक्षाकडून अधिकृतपणे बोलण्याचा अधिकारच नाही, असं वक्तव्य भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असा विश्वास लाड (Prasad Lad on Sanjay Raut) यांनी व्यक्त केला.
संजय राऊत यांचं वक्तव्य अधिकृत नाही. ते शिवसेनेचे नेते असले, तरी त्यांना याबद्दल अधिकृतरित्या बोलण्याचा अधिकार नाही, असं प्रसाद लाड म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एक परिपक्व राजकारणी आहेत. ते ठाकरे आहेत. सरकार आमचंच बनेल, असा विश्वासही लाड यांनी व्यक्त केला.
प्रत्येक कार्यकर्ता हा त्याच्या नेत्याला आवडेल असं बोलत असतो. मात्र ‘मातोश्री’ची भूमिका स्पष्ट आहे, असं प्रसाद लाड म्हणाले. कोण कोणाला भेटतंय याचा राजकीय अर्थ काढू नये, असं म्हणत संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीमागे राजकीय हेतू नसल्याचं प्रसाद लाड म्हणाले.
येत्या तीन-चार दिवसात महायुतीचं सरकार बनेल आणि देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असंही प्रसाद लाड यांनी (Prasad Lad on Sanjay Raut) स्पष्ट केलं. मात्र शिवसेनेच्या वाट्याला नेमकं काय येणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
काय म्हणाले होते संजय राऊत?
आम्ही हवेत बोलत नाहीत, आकडे नसताना आमचं सरकार येणार हे आम्ही कधीही म्हटलं नाही. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, हे लिहून घ्या. शिवसेनेने मनावर घेतलं, तर स्थिर सरकारसाठी शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते, असं संजय राऊतांनी दंड फुगवून सांगितलं होतं.
बहुमत सिद्ध करण्याची ताकद, लिहून घ्या, मुख्यमंत्री शिवसेनेचाच : संजय राऊत
महाराष्ट्राच्या जनतेसमोर हा फॉर्म्युला ठरला होता. महाराष्ट्राच्या जनतेलाच शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा आहे. जो फॉर्म्युला ठरला होता त्यानुसार भाजपने निर्णय घ्यावा, असं संजय राऊत म्हणाले होते.
त्याचवेळी, बहुमत असेल तर भाजपने शपथविधी घ्यावा, असं आव्हानही संजय राऊत यांनी दिलं. ‘राज्यातील नेत्यांनी निर्णय घ्यावा असं केंद्राने सांगितलं आहे, मात्र राज्यातील नेते यात अपयशी ठरले. युती आहे तर निकालाच्या दिवशीच चर्चा सुरु का केली नाही? आठवडाभर वाट का पाहिली? 24 तारखेलाच सत्ता स्थापनेच्या चर्चेला सुरुवात करायला हवी होती’ असंही संजय राऊत म्हणाले होते.