नांदेड : आतापर्यंत चार पक्ष बदलून आलो. आता मला पक्ष बदलायचा नाही. पण मी एक धोरण घेतलंय ‘जिना यहां, मरना यहां’ अशा शब्दात भाजपचे नांदेडमधील (Nanded BJP) खासदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhalikar) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना नांदेडला भाजपचा बालेकिल्ला करण्याचं आश्वासन दिलं.
‘मी जो काही आहे, त्याची दोनच कारणं आहेत. एक तर भारतीय जनता पक्ष आणि दुसरे म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. माझ्यासारखा मीच आहे. आतापर्यंत चार पक्ष बदलून आलो. आता मला पक्ष बदलायचा नाहीये. पण मी एक धोरण घेतलंय जीना यहा मरना यहा.’ असं प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले.
देवेंद्र फडणवीस साहेब, मी जोपर्यंत जिवंत आहे. तोपर्यंत तुमचा कार्यकर्ता म्हणून या भागामध्ये काम करणार. त्या भागामध्ये तुम्हाला जो अपेक्षित भारतीय जनता पक्ष आहे. तो नांदेड जिल्हा भाजपचा बालेकिल्ला होणार, तो नारा सार्थ केल्याशिवाय राहणार नाही, असं आश्वासनही चिखलीकरांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने आयोजित सभेसाठी मुख्यमंत्री नांदेडला आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकरांनी या सभेत समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. जनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचं शहरात जागोजागी भव्य स्वागत झालं. यावेळी देवेंद्र फडवणीस यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा नामोल्लेख टाळत त्यांच्यावर टीका केली.
‘या लोकसभा निवडणुकीत नांदेडने एक नवा इतिहास तयार केला आहे. अशोकाचं झाड उंचच उंच वाढतं. त्याची सावली कोणाला मिळत नाही. लोकसभेच्या निवडणुकीत तुम्ही नवी सावली या ठिकाणी शोधलेली आहे. एक नवा इतिहास तुम्ही केलेला आहे.’
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकर यांनी पराभव केला होता. अशोक चव्हाण यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे चिखलीकर हे निकटवर्तीय होते, मात्र अशोक चव्हाणांचे ते विरोधक झाले.
काँग्रेसला रामराम ठोकून 2012 मध्ये चिखलीकरांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ऑगस्ट 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. तर 2019 मधील लोकसभा निवडणुकांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. 2014 मध्ये मोदीलाटेत काँग्रेसने ज्या दोन जागा जिंकल्या होत्या, त्यात नांदेडची एक जागा जिंकली होती. त्यानंतरही अशोक चव्हाणांनी नांदेड महापालिकेची निवडणूक जिंकली होती. मात्र, यंदा लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाणांना पराभवाला सामोरं जावं लागलं.