मुंबई : गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांचा सातत्याने शिंदे, फडणवीस सरकारवर हल्लाबोल सुरूच आहे. मोदींची मिमिक्री केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मात्र तरी देखील त्यांची टीका सुरूच आहे. आता अंधारे यांच्या या टीकेला शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सुषमा अंधारे या कोण आहेत, त्यांनी आपला इतिहास तपासावा असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.
प्रताप सरनाईक यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मला लोकांची विकास कामे करायची आहेत. या सुषमा अंधारे कोण आहेत? ज्यांनी काल पक्षात प्रवेश केला आणि आज बोलत आहेत. पक्षात येण्यापूर्वी त्यांनी अनेकदा शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांवर टीका केली आहे. अशी जर एखादी व्यक्ती मीरा-भाईंदर शहरात येऊन काहीही बोलत असेल तर ते चुकीचं आहे. सुषमा अंधारे यांनी आधी आपला इतिहास पहावा. आपण इथपर्यंत कशा पोहोचलो, आपण कोणाबद्दल बोलत आहोत याचा अंधारे यांनी विचार करावा असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.
प्रताप सरनाईक यांनी पुढे बोलताना म्हटलं आहे की, मला सुषमा अंधारे यांच्याबद्दल जास्त काही बोलायचं नाही. मला विकास करायचा आहे. मी मीरा – भाईंदरचा विकास करणार असं सरनाईक यांनी म्हटलं आहे. प्रताप सरनाईक यांच्या टीकेला आता सुषमा अंधारे आणि ठाकरे गट काय प्रत्युत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.