पक्षाला आमची लायकी वाटत नसेल : प्रताप सरनाईक

| Updated on: Dec 31, 2019 | 8:16 AM

प्रताप सरनाईक हे तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत. ते ठाण्यातील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार आहेत

पक्षाला आमची लायकी वाटत नसेल : प्रताप सरनाईक
Follow us on

मुंबई : मंत्रिमंडळात वर्णी न लागल्यामुळे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक प्रचंड नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. पक्षाला आमची लायकी नाही, असं वाटलं असेल, तर आम्ही दखल घेण्यास भाग पाडू, अशा शब्दात सरनाईकांनी संतापाला वाट मोकळी करुन दिल्याची माहिती आहे (Pratap Sarnaik on Shivsena).

‘आज आमची लायकी नाही, असं कदाचित पक्षाला वाटत असेल. मात्र आम्ही आमची लायकी सिद्ध करु आणि पक्षाला दखल घेण्यास भाग पाडू. त्यानंतरच मंत्रिपद मिळवू’ अशा शब्दात प्रताप सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केल्याचं एका वृत्तपत्राने म्हटलं आहे.

प्रताप सरनाईक हे तिसऱ्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत. ते ठाण्यातील ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार आहेत. ठाण्यात सरनाईक आणि एकनाथ शिंदे या दोन्ही घराण्यांचं वर्चस्व आहे. मात्र दोघांमध्येही राजकीय चढाओढ पाहायला मिळते.

मंत्रिपद न मिळाल्याने नाराज राष्ट्रवादी आमदार प्रकाश सोळंके राजीनामा देणार

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे विस्तारामध्ये सरनाईकांना संधी मिळेल, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु मंत्रिपदं जाहीर झाल्यानंतरही लॉटरी न लागल्याने सरनाईकांचा संताप झाल्याचं दिसत आहे.

दुसरीकडे, जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिपद मिळाल्यामुळेही प्रताप सरनाईक यांचा तिळपापड झाल्याचं म्हटलं जात आहे.

घेशील किती दोन करांनी?

प्रताप सरनाईक यांच्या घरात पत्नी परिषा सरनाईक आणि पुत्र पूर्वेश सरनाईक नगरसेवक आहेत. त्यांच्या सहकाऱ्याची पत्नी आशा डोंगरे यांनाही नगरसेवकपद देण्यात आलं आहे. त्यामुळे एकाच व्यक्तीला किती पदं द्यायचे, हा विचार करुन पक्षप्रमुखांनी सरनाईक यांना तूर्त मंत्रिमंडळाबाहेर बसवल्याचं मानलं जातं.

सत्तास्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांनाही मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे राऊत बंधू नाराज असल्याच्या चर्चा होत्या. सुनिल राऊत आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचंही बोललं जात होतं.

माजी मंत्री तानाजी सावंत यांनाही मंत्रिमंडळापासून दूर ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे सावंतही नाराज असल्याचं समोर आलं आहे. फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलेले शिवसेनेचे जुने-जाणते नेते दिवाकर रावते, दीपक केसरकर, रामदास कदम, रवींद्र वायकर, दीपक सावंत यांनाही मंत्रिपद देण्यात आलेलं नाही. त्याऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी दिली गेली आहे. Pratap Sarnaik on Shivsena