पंढरपूर : निवडणुका जवळ आल्या की नेत्यांना आपल्या कार्यकर्त्यांची आणि मतदारांची आठवण यायला सुरुवात होते आणि यासाठी सर्वांना एकत्र आणण्याचं ठिकाण म्हणजे तीर्थाटन. तीर्थाटनाच्या नावाखाली आज अनेक आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी आपला स्वार्थ साधला आहे. मुंबईतील असाच एक मतदार आणि कार्यकर्त्यांचा मेळावा विठुरायाच्या पंढरी नगरीमध्ये भरवण्यात आला आहे. हा कार्यक्रम भरवलाय गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी, यासाठी थोडे थोडके नाही, तर 1100 भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी आणले आहेत आणि त्यांची विशेष सोयही केली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवण्यासाठी भाजप मंत्री सरसावले आहेत. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी आपल्या घाटकोपर विधानसभा मतदार संघातील 1100 मतदारांना आज सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची विशेष सोय करण्यात आली. त्यांनी सर्व मतदारांसाठी मुंबई ते कुर्डूवाडी अशी संपूर्ण ट्रेन बुक केली होती, तर कुर्डूवाडी ते पंढरपूर, तुळजापूर आणि अक्कलकोट या देवस्थानला दर्शनासाठी जाण्यासाठी जवळपास 26 ट्राव्हल्स त्यांच्या सेवेसाठी उपलब्ध होत्या. त्याच बरोबर चार दिवस त्यांच्या राहण्याची खाण्याची शाही व्यवस्था देखील मंत्री महोदयांनी केली होती. त्यामुळे या मतदार राजांना पंढरीनाथाचे दर्शन घडवून आपल्या पदरात मताचे दान पडणार का हे जरी आता स्पष्ट झाले नसले, तरी आचारसंहिता जाहीर होईपर्यंत अनेक इच्छुक आपल्या मतदारांना तिर्थाटनाचा लाभ घडवून आणतील, असे म्हटले वावगे ठरणार नाही.
मुंबईशिवाय हे महाराष्ट्र आणि देशातील अनेक अनेक भागात असे प्रकार दिसून येतात. मतदारांना भक्तीच्या नवाखाली भावनिक करुन राजकारण करणारी मंडळी मोठ्या प्रमाणात आपल्या देशात आहेत. निवडणुकीआधी अशा अनेक तीर्थक्षेत्र सहली आपल्याला पाहण्यास मिळतील. वैष्णोदेवी, काळुबाई अशा महत्त्वाच्या ठिकाणी या सहली घेऊन जातात. मात्र अशा गोष्टीला आपण किती आहारी जायचे हे आपण तरुण आणि सुशिक्षीत मतदारांनी ठरवणे गरजेचे आहे.