मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवरुन राज्याला संबोधित केलं. मुख्यमंत्र्यांच्या याच संबोधनावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी टीकास्त्र सोडलंय. मुख्यमंत्र्यांच्या संबोधनात कोणतीही भरीव गोष्ट दिसली नाही. नेहमीप्रमाणे केवळ शब्दांचे बुडबुडे होते, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली. (Pravin Darekar Criticized Cm Uddhav Thackeray)
“मुख्यमंत्र्यांनी आजच्या संबोधनातून फक्त सहानभूतीचं वातावरण निर्माण केलं. कोणताही भरीव गोष्ट त्यांच्या संबोधनातून अधोरेकित झाली नाही. मराठा आरक्षण, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत, एस.टी. कर्मचाऱ्यांचा पगार, महिला अत्याचार याविषयी उद्धव ठाकरे काहीही बोलले नाहीत”, असा निशाणा प्रवीण दरेकरांनी मुख्यमंत्र्यांवर साधला.
“गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आंदोलकांचा आक्रोश सुरु आहे. मात्र सरकारच्या कानावर तो आक्रोश पोहोचत नाही. आजच्या संबोधनात मराठा आरक्षणावर उद्धव ठाकरे यांनी बोलायला हवं होतं. मात्र त्यांनी मराठा आरक्षणासाठी सरकार काय करणार आहे, हे स्पष्ट केलं नाही”, असं दरेकर म्हणाले.
“गेल्या 15-20 दिवसांपूर्वी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेला. त्या शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. मात्र कित्येक दिवस उलटून गेल्यानंतरही शेतकऱ्यांना आणखी मदत मिळाली नाही. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे अजूनही झालेले नाही”, असं दरेकर म्हणाले.
“मुख्यमंत्र्यांनी अनेक सामंजस्य करार केल्याचं आजच्या संबोधनात सांगितलं. पण फक्त करार करुन चालणार नाही तर त्याची अंमलबजावणी व्हायला हवी”, असंही दरेकर म्हणाले. दुसरीकडे एस.टी. कर्मचारी दिवाळी कशी गोड साजरी होणार?, असा सवाल करत मुख्यमंत्री त्यांच्या पगाराविषयी बोलले नाहीत, त्यांची दिवाळी गोट होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काहीतरी पावले उचलायला हवीत”, असं दरेकर म्हणाले.
“गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्राच्या विविध भागांत महिला अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे. पुण्याच्या शिरुरची घटना ताजी आहे. असे प्रकार महाराष्ट्रात सातत्याने होत आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यावरही बोलणं टाळले. एकूणच आजच्या संबोधनात फक्त भावनिक आवाहन करुन जनतेची त्यांनी दिशाभूल केली पण मुख्यमंत्री म्हणून या सगळ्या मुद्द्यांवर ते काय करणार आहे? हे त्यांनी स्पष्ट केले नाही. फक्त शब्दांचे बुडबुडे, अशी टीका दरेकरांनी केली.
(Pravin Darekar Criticized Cm Uddhav Thackeray)
संबंधित बातम्या
CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद, 10 महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य
मिठागरात मिठाचा खडा टाकू नका; टीकेची पर्वा न करता कामं करणारच; मुख्यमंत्र्यांचा निर्धार
धार्मिकस्थळं उघडणार, दिवाळीनंतर नियमावली करणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा