माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभा संपर्क प्रमुखांची मुंबईत बैठक बोलावली होती. या बैठकीत त्यांनी संपर्क प्रमुखांना मार्गदर्शन करतानाच पाच सूत्री कार्यक्रम दिला आहे. गावागावात शाखा स्थापन करण्यापासून ते मतदार नोंदणी करण्यापर्यंतच्या सूचना उद्धव ठाकरे यांनी दिल्या. निवडणुकांना अवघे 41 दिवस उरले आहेत. त्यामुळे कामाला लागा. चांगलं काम करा, अशा सूचनाच उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्क प्रमुखांना दिल्या आहेत.
उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात आज विधानसभा संपर्क प्रमुखांची बैठक बोलावली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांनी संपर्क प्रमुखांशी संवाद साधून त्यांना निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील 41 दिवसात आचार संहिता लागेल, त्यामुळे जोमाने काम करा, असे आदेशच उद्धव ठाकरे यांचे विधानसभा संपर्कप्रमुखांना दिले आहेत. 4 ऑगस्ट ते 11 ऑगस्टपर्यंत भगवा सप्ताहाचे आयोजन करण्याचे आदेशही उद्धव ठाकरे यांनी विधानसभा संपर्कप्रमुखांना दिले आहेत.
शिवसेनेच्या या भगवा सप्ताहमध्ये विधानसभा क्षेत्राचा आढावा घेऊन त्याची माहिती सेनाभवन येथे सादर करायची आहे. यामध्ये विविध कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी बैठका घेण्याचे आदेशही देण्यात आले. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढील 4 महिन्यात 15 दिवसातून दोन दिवस विधानसभा क्षेत्रात संपर्कप्रमुखांनी स्वतः उपस्थितीम राहून आढावा घेण्याचे आदेशही उद्धव ठाकरे यांनी दिले.
1. सर्व विधानसभा संपर्कप्रमुखांनी मतदारसंघात दौरा करणे आवश्यक. सोबत संबंधित उपजिल्हाप्रमुख आणि तालुकाप्रमुख असणे आवश्यक आहे.
2. सदर मोहिमेअंतर्गत प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये बैठक आयोजित करणे आवश्यक आहे.
3. बैठकीसाठी स्थानिक विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख (पुरुष-महिला), युवासेना शाखा युवा अधिकारी आदी पदाधिकारी अपेक्षित आहेत.
4. सदर मोहिमेअंतर्गत खालील माहिती अपेक्षित आहे.
१) गावातील शाखाप्रमुख, शाखासंघटक, युवासेना शाखा युवा अधिकारी इत्यादींची नावे आणि दूरध्वनी
२) गावात किती शिवसैनिकांची नोंदणी झाली आहे?
३) नवीन मतदारांची नोंदणी किती झाली?
४) किती गावांमध्ये शाखा नाही?
५) नसल्यास कधीपर्यंत स्थापन करणार
5. विभागात कार्यरत असणाऱ्या ज्येष्ठ शिवसैनिकांची यादी मोबाईल क्रमांकासहित जोडावी.
१) गटप्रमुखाचे नाव
२) यादी क्रमांक
३) संपर्क क्रमांक