पालघर: राष्ट्रपतीपदाची निवडणूक (President Election) आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. भाजपाकडून (BJP) द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) तर विरोधीपक्षांकडून यशवंत सिन्हा यांना राष्ट्रपतीपदाच्या निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे. यशवंत सिन्हा यांना काँग्रेस, राष्ट्रवादी, टीेएमसी, एवढेच नव्हे तर तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाने देखील पाठिंबा दिला आहे. मात्र शिवसेनेने कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा यावरून आता अंतर्गत मतभेत निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहेत. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र शिवसेनेने भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी आता शिवसेनेच्या खासदारांकडून सुरू झाली आहे. याबाबत पालघरचे शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांनी पत्र लिहिले आहे.
खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहेत. या पत्रामध्ये गावित यांनी शिवसेनेने भाजपाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा असे म्हटले आहे. देशाला स्वातत्र्य मिळून अनेक वर्ष झाली. मात्र स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एखाद्या पक्षाकडून आदिवासी महिलेला राष्ट्रपतीपदाची उमेदवारी मिळाली आहे. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्यास भारतातील आदिवासी समाजाला यामुळे मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होईल. त्यामुळे शिवसेनेने एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी मागणी गावित यांनी केली आहे. आता शिवसेना या पत्रानंतर काय भूमिका घेणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाकडून द्रौपदी मुर्मू यांना उमदेवारी देण्यात आली आहे. तर विरोधीपक्षाकडून यशवंत सिन्हा हे उमेदवार आहेत. या निवडणुकीत भाजपाविरोधात सर्व विरोधी पक्ष एकवटले आहेत. मात्र तरी देखील संख्याबळाचा विचार करता या निवडणुकीत भाजपाचे पारडे जड माणण्यात येत आहे. यशवंत सिन्हा यांना काँग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी अशा सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. मात्र शिवसेना काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.